औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये घरोघरी सॅनिटायझरने बाटल्या भरलेल्या असायच्या. घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे मारला जात असे. मात्र, अनलॉक सुरू झाले, लसीकरणामुळे शहरवासीयांमध्ये बिनधास्तपणा आला आणि सॅनिटायझरचा विसर पडला. अनेक घरात सॅनिटायझर विना बाटल्या कानाकोपऱ्यात धूळ खात आहेत. कोरोना काळात महिन्याला दीड लाख लिटर सॅनिटायझरची विक्री होत होती. मात्र, अनलॉकनंतर ही विक्री अवघ्या दहा हजार लिटरवर आली आहे.
कोरोनाचा धोका टळलेला नाही. प्रत्येकाने मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे दिला जात आहे. मात्र, शहरात अजूनही २० ते २२ टक्के नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून सॅनिटायझरची विक्री तब्बल ९० टक्क्यांनी घटली आहे. केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सॅनिटायझरची विक्री महिन्याकाठी दीड लाख लिटर एवढी होती. कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यामुळे लोकांनी सॅनिटायझर खरेदी करणे कमी केेले होते. मात्र, पुन्हा फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेमुळे सेनिटायझरची विक्री वाढली. नंतर कोरोना प्रतिबंधक लस जानेवारीपासून आरोग्य केंद्रात उपलब्ध झाली. यामुळे निर्बंध असतानाही लोक निर्बंधमुक्त झाल्यासारखे वावरत होते. लस आली आणि सॅनिटायझरची विक्री घटली. आता शहरवासीय एवढे बिनधास्त झाले की, सॅनिटायझरच्या बाटल्या, कॅन अडगळीत पडले आहेत. सॅनिटायझरची जून महिन्यात केवळ १० हजार लिटर विक्री झाली. जुलैमध्ये हीच परिस्थिती आहे.
दुकानात, कार्यालयात शोभेची वस्तू
अनेक दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये, सरकारी कार्यालयात सॅनिटायझरच्या बाटल्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. स्टँडवर सॅनिटायझरची बाटली ठेवलेली असते; पण तिचा वापर कोणी करत नाही. एक बाटलीतील सॅनिटायझर संपायला १५ ते २० दिवस लागतात. मागील वर्षी दोन ते तीन दिवसांत बाटली संपत असे, असे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
चौकट
किंमत घटली तरी मागणीत वाढ नाही
मागील वर्षी सॅनिटायझरचे ५ लिटरचे एक कॅन एक हजार रुपयांपर्यंत विक्री होत असे. मात्र, नंतर त्याच्या किमती कमी झाल्या. सध्या ५ लिटरचे कॅन ३५० ते ५०० रुपये दरम्यान मिळत आहे. किमती कमी होऊनही सॅनिटायझरचा वापर मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाला.