- स .सो. खंडाळकरऔरंगाबाद : सलीम अली तलाव परिसरात १३२ प्रकारचे पक्षी, तीस प्रकारची फुलपाखरे, शेकडो प्रकारचे कीटक, दहा प्रकारचे साप, विविध पाणवनस्पती, सरपटणारे प्राणी आढळतात. भर शहरात असणारा पाणथळीचा आणि जैव विविधता असणारा सलीम अली सरोवर हा एकमेव तलाव महाराष्ट्रात आहे.
पाणथळ म्हणजे जमीन आणि खोल पाण्याच्या मधली उथळ पाण्याची जागा किंवा दलदल. पाणथळ ही एक मोठी परिसंस्था असून, उथळ पाण्याचे ठिकाण असल्याने सूर्यप्रकाश थेट आतमध्ये जाऊन पाण्याच्या तळाशी शेवाळ, विविध पाणवनस्पती उगवतात. त्यांना खाण्यासाठी झिंगे, मासे, किडे व इतर जलचर येतात व त्यातून परिपूर्ण अन्नसाखळी तयार होते. पाणथळीतील झुडुपे, पाणवनस्पती, विविध जलचर हे पाणी शुध्द करण्याचे काम करतात. तसेच वातावरणात ऑक्सिजन सोडतात. जो सजीवांसाठी उपयुक्त असतो.
पाणथळ हे पाणी साठवतात, जैवविविधता जपतात, शुद्ध पाणी देतात, आसपासच्या विहिरी, बोअर यांची पाणीपातळी वाढवतात. धान्य, फळे देतात. पशुपक्ष्यांना, मनुष्याला अन्न देतात. म्हणून पाणथळीचे रक्षण करणे गरजेचे आहे. औरंगाबाद परिसरात सुखना तलाव, गिरिजा प्रकल्प, ढेकू तलाव, जायकवाडी व औरंगाबाद शहरातील सलीम अली तलाव हे पाणथळीचे उत्तम नमुने आहेत. दुर्दैवाने इथे मानवी अतिक्रमणांमुळे जैवविविधता धोक्यात आलेली आहे.