औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करून शहरात व्यापक प्रमाणात खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम निव्वळ ‘धूळफेक’असल्याचे निदर्शनास येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पॅचवर्कच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च होणार असले तरी हा खर्च पाण्यात जात आहे. ज्या ठिकाणी डांबरी पॅचवर्क करण्यात येत आहे, तेथील खडी दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर पसरत आहे. या निकृष्ट दर्जाकडे महापालिकेतील अधिकारी सोयीकरपणे ‘डोळेझाक’ करीत आहेत.मागील तीन महिन्यांपासून औरंगाबादकर खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांच्या मुद्यावर मागील दोन महिन्यांपासून महापालिकेत प्रशासन विरुद्ध पदाधिकारी, असा ‘कलगीतुरा’रंगला आहे. दोघांच्या वादात सर्वसामान्य नागरिक खड्ड्यांमुळे मेटाकुटीला आले आहेत. अखेर प्रशासनाने गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून उदार अंत:करणाने विसर्जन मार्गावरील पॅचवर्क सुरू केले. प्रत्येक वॉर्डनिहाय १० लाख रुपयांच्या पॅचवर्कला मंजुरी देण्यात आली. ९० लाख ते १ कोटी रुपये पॅचवर्कवर खर्च करण्यात येणार आहे. अनेक वॉर्डांमध्ये मनपाच्या निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने डांबर लॉबीकडून ‘६७-३ सी’या आणीबाणीच्या कलमान्वये काम होत आहे.मनपाने पहिल्या टप्प्यात विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी मुरमाने खड्डे बुजविण्यात येत आहेत. आज टाकलेला मुरूम उद्या निघून जात आहे. जिथे डांबरी पॅचवर्क सुरू आहे, त्या रस्त्यांची गत निराळीच आहे. या पॅचवर्कमध्ये एवढी जाड खडी वापरण्यात येत आहे की, ती दुसऱ्याच दिवशी निघून जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते सलीम अली सरोवर, हडको कॉर्नर ते सिद्धार्थनगर येथील रस्त्यांवर हे चित्र पाहायला मिळत आहे.
मनपाकडून जखमेवर ‘मीठ’
By admin | Published: September 15, 2016 12:31 AM