लोकमत न्यूज नेटवर्कसोयगाव : सोयगाव तालुक्यातील तिखी या गावात चार महिन्यांपासून क्षारयुक्त पाणी ग्रामस्थांच्या पिण्यात आल्याने संपूर्ण गाव किडनीच्या विकाराने त्रस्त झाले आहे. दरम्यान, सोमवारी अख्ख्या गावातील २५ जणांना पोटाचा विकार व किडनीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पाचोरा, येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील पाण्याच्या स्रोताचे पाच नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.कवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तिखी या गावाला पाणीपुरवठ्याची नळ योजना कार्यान्वित आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीतील पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने ग्रामस्थांना क्षारयुक्त पाणी पिण्यात येऊन, स्टोनच्या बाधेने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. गावातील २५ नागरिकांना सोमवारी किडनीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या विहिरीत क्षारचे वाढत्या प्रमाणाचे अद्याप कारण स्पष्ट झाले नसून आरोग्य विभागाने विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.तिखी गावात आरोग्य पथकाला पाठविण्यात आले आहे. स्टोनपेक्षा पोटाचे विकार जास्त प्रमाणात जडल्याचे आरोग्य पथकाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोटाच्या विकाराचे निदान व सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जास्त त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना पाचोरा येथे उपचारासाठी जाण्याचा सबुरीचा सल्ला दिला आहे.डॉ.श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, सोयगावतिखी गावच्या घटनेची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याने स्थिती चिंताजनक नाही; परंतु काही रुग्णांना पोटाचे विकार मोठ्या प्रमाणावर जडले आहेत. यासाठी औषधी साठा संकलन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येऊन आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.-प्रकाश दाभाडे, प्रभारी गटविकास अधिकारी, सोयगाव