- श्यामकुमार पुरेसिल्लोड: ग्रामीण भागात कोरोना अजून पसरला नाही मात्र याची धास्ती ग्रामस्थांनी सुद्धा घेतली आहे. पण आपल्या गावात कुणी संशयित तर नाही याची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची वाट न बघता तालुक्यातील वांगी खुर्द येथील विजय म्हस्के या युवकाने पुढाकार घेऊन स्वतः मशीन खरेदी करून अख्या ग्रामस्थांची स्क्रीनिंग केली. यातून तब्बल 1300 लोकांची स्क्रीनिंग केली झाली असून त्यात कुणी संशयित सापडला नसल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
शासनाने असे केले पाहिजे...तसे केले पाहिजे असे म्हणणारे खूप लोक आहेत पण सरकारी कृती आणि मदतीची अपेक्षा न ठेवता स्वयंप्रेरणेने काम करणारे खूप कमी सापडतील. वांगी खुर्द येथील विजय म्हस्के हे असेच व्यक्तिमत्व ठरले आहे. म्हस्के हे औरंगाबाद येथे एका कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांनी आपला मुक्काम मूळगावी वांगी खुर्द येथे हलवला. या संकट काळात आपण गावाचे काही देणे लागतो, गावासाठी काही केले पाहिजे या भावनेने त्यांनी संपूर्ण गावात जंतूनाशकाची फवारणी केली. यानंतर शासनाच्या कृतीची वाट न पाहता तापमापक यंत्र खरेदी करून संपूर्ण गावची स्क्रीनिंग केली. दारोदार फिरून त्यांनी जवळपास १३०० ग्रामस्थांची स्क्रीनिंग केली. यात कोणीही संशयित सापडले नाही. मस्के यांच्या कार्याने प्रभावित होत ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले आहे. विजय यांनी जनसेवेचा वसा हाती घेतला आहे. निस्वार्थी भावनेने ते कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला आम्हा सर्वांचा सदैव पाठिंबा राहील अशी प्रतिक्रिया राजु सिरसाळे या ग्रामस्थाने दिली.