अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी गुन्हा
औरंगाबाद : नक्षत्रवाडी येथील गायरान जमिनीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने विनापरवानगी मुरूम उत्खनन करणाऱ्या विरुद्ध महसूल अधिकाऱ्यांनी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविला. दिलीप रामकृष्ण जाधव (५१, रा. रामकृष्णनगर) यांनी याप्रकरणी जेसीबी चालक बाबासाहेब जनार्दन आगळे यांच्या विरुध्द सातारा ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दुचाकीस्वाराला हूल देऊन मारहाण
औरंगाबाद : दुचाकीला हूल का दिली, असा जाब विचारणाऱ्या शुभम प्रकाश मरमट (१८, रा. पदमपुरा) या तरुणाला तीन अनोळखी दुचाकीस्वारांनी बेल्टने मारहाण करून जखमी केले. २१ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता कोकणवाडी चौक ते स्टेशन रोडवर झाली. याविषयी शुभम यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.
हुंड्याच्या ५ लाखासाठी विवाहितेचा छळ
औरंगाबाद : लग्नात राहिलेले हुंड्याचे ५ लाख रुपये घेऊन ये, म्हणून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला नांदविण्यास नकार देणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती अर्शद खान, सासरा असद खान, सासू आणि नणंदेचा आरोपींमध्ये समावेश आहे.