औरंगाबाद : सर्वांना समान न्याय, समता आणि बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात सलग १० दिवस साजरी करण्यात येत आहे. बुधवारी ( दि.६ ) सुरु झालेल्या समता महोत्सव शनिवारी ( दि.१६ ) तारखेपर्यंत विविध उपक्रमाने साजरा होत आहे. आतापर्यंतच्या सर्व उपक्रमांना विद्यार्थी, नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्फूर्त सहभाग मिळत आहे.
येथील सामाजिक न्यायभवनात बुधवारी ( दि. ०६ ) प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांच्या हस्ते या समता सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त पी. जी. वावळे यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तर गुरुवारी ( दि. ०७ ) विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धांना शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शुक्रवारी ( दि. ०८ ) स्वाधार शिष्यवृत्ती आणि मिनि ट्रॅक्टर लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. तर आज ( दि. ९ ) विविध योजनांच्या जनजागृती संदर्भात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. यात अनेक जेष्ठांनी सहभाग नोंदवला. या सप्ताहांतर्गत उद्या रविवारी ( दि. १० ) समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.
रक्तदान मेळावा, संविधान जागर- तर सोमवारी ( दि. ११) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी रक्तदान मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी ( दि. १२ ) मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी ( दि. १३ ) संविधान जागर हा विशेष कार्यक्रम.
व्याख्यान,जात पडताळणी प्रमाणपत्र वितरण गुरुवारी ( दि. १४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम. व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील. या सोबतच शुक्रवारी दि. १५ रोजी डॉ. बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तर शनिवारी दि. १६ एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन आयोजक सहाय्यक आयुक्त पी.जी. वावळे यांनी केले आहे.