औरंगाबाद : तेच सभागृह आणि चर्चा करणारे चेहरेही तेच. फक्त व्यासपीठावरील नेते बदलले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी शहराच्या विकासावर चर्चा करण्यासाठी यावेळी पुन्हा एकदा सेनेने शहरातील बुद्धिवंतांची बैठक बोलावली होती त्याचे हे चित्र.
जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये उद्योग, नगररचना, बांधकाम, पर्यटन क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी शहर व जिल्हा विकासाच्या अनुषंगाने मुद्दे मांडताना १९९५ साली युतीचे सरकार आल्यानंतर शिवसेनाप्रमुखांसमक्ष ज्या घटकांवर चर्चा झाली होती, दुर्देवाने आजही त्याच बाबींवर चर्चा करावी लागत असल्याचे उद्योजक उल्हास गवळी म्हणाले. सीआयआयचे विभागीय अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले, शहरात ४० आयटी उद्योग आहेत. साडेतीन हजार रोजगार त्यामध्ये आहेत. शहराला औद्योगिक वातावरण आहे. कॉस्ट ऑफ ऑपरेशन कमी आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यानंतर येथे गुंतवणूक सोपी आहे. भूमिपुत्रांनी आंतरराष्ट्रीय उद्योग सुरू केले आहेत. राज्याच्या तुलनेत औरंगाबादचा ग्रोथ रेट २८ टक्के आहे. या तुलनेत अनुदान पुरवावे लागेल. धोरणात्मक विचार करावा लागेल. येथील व्हेंडर्सला काम मिळेल, असे निर्णय व्हावेत. रोजगारनिर्मितीसाठी आयटी क्षेत्राला चालना देणे गरजेचे आहे.
ऋषी बागला यांनी विमानतळ, रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढावी, यावर लक्ष केंद्रित केले. उद्योजक राम भोगले, जसवंतसिंग, प्रमोद खैरनार आदींनी सर्वांगीण मते मांडली.
१३ मिनिटे १० सेकंद बोलले ठाकरे
सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आधी नागरिकांशी बोलायचे ठरविले, त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. विकाससंवाद (डेव्हलपमेंट डायलॉग) औरंगाबादमधून सुरू करतो आहे. आता कामे करून दाखवू शकतो. तीन चाकाचे सरकार असल्यामुळे जास्त स्थिर आहे. शहरासाठी मास्टर प्लान फेजवाईज तयार करणे गरजेचे आहे. आता वर्कींग ग्रूप स्थापन केला पाहिजे. नागरिकांमधून विविध संघटनांचे लोक वर्किंग ग्रूपमध्ये असले पाहिजे. एनजीओप्रमाणे सीजीओ निर्माण करू. मास्टर प्लान करणे सोपे आहे. परंतु, त्यातील काही गोष्टी होतात काही होत नाहीत. त्यावर मॉनिटरींग गरजेचे आहे. निवडणुकीपुरते हे काम नाही, शहर पुढे कसे दिसेल. यासाठी काम करावे लागेल. पर्यटन, पर्यावरण, शहरविकासासाठी काय करावे लागेल, यासाठी जानेवारीअखेरीस पुन्हा चर्चा करू. रेल्वे, विमानतळाचे मुद्दे ऐकले, परंतु स्टेकहोल्डर्सचा मुद्दा लक्षात घेतला आहे. दोन-तीन दिवस राऊंडटेबल चर्चा करू.
चौकट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खचाखच भरला हॉल
कोरोनाच्या पार्श्वभूमी असताना हॉटेलचे सभागृह खचाखच भरले होते. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, कुलगुरू यांच्यासह सरकारच्या मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांसह १०० हून अधिक उद्योजकांच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला.