:पाटोदा जि.प.शाळेच्या शिक्षिका विद्या गवई यांचा उपक्रम
:संस्कार सुमने बोधकथेचे २५० भाग सादर
पाटोदा जि.प.शाळा : संस्कार सुमने बोधकथेचे २५० भाग सादर
शेख महेमूद
वाळूज महानगर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करीत पाटोदा जि.प.शाळेच्या शिक्षिका विद्या गवई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ‘संस्कार सुमने’ हा बोधकथेचा उपक्रम वर्षभरापासून सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत ऑडिओ क्लिपद्वारे रंजक व साहसी बोधकथा व्हॉट्सॲप, फेसबुक व सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या ज्ञानात भर घातली जात आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गत वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांवर बालवयात चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. एखादी शिकवण उपदेशासारखी न देता गोष्टीच्या माध्यमातून देण्याचा व संस्कार कथांमधून मुलांचे भावविश्व समृद्ध करण्याचा प्रयत्न पाटोदा शिक्षिका विद्या गवई यांनी सुरू केला आहे. लॉकडाऊन काळात गतवर्षी २३ सप्टेंबरला विद्या गवई-नरवाडे यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करीत ‘ संस्कार सुमने’ हा बोधकथेचा उपक्रम राबविला. कोरोनाने विद्यार्थी व शिक्षकांची ताटातूट केली असली तरी आधुनिक तंत्रज्ञानाने या दोघांना पुन्हा एकदा जोडण्याचे काम विद्या गवई यांनी सुरु केले आहे. केवळ आपल्या शाळेतील नव्हे तर संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणाचा पेटारा उघडण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात बालविरांच्या साहसी कथा, म्हणीवर आधारित गोष्टी, थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा परिचय, त्यांच्या बालपणाच्या रंजक कथा, थोर इतिहासकार, शास्त्रज्ञ यांच्या कथा व शोध तसेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आदीविषयी गोष्टीच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न शिक्षिका गवई यांनी सुरु केला आहे.
ऑडिओ क्लिपचाही वापर
प्रेरणादायी व संस्काराचे धडे देणाऱ्या कथा व गोष्टी ऑडियो क्लिपद्वारे विद्यार्थी व त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवित आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अस्सल देशी कथा-गोष्टीबरोबरच जपान व इतर भाषेतील कथाचे अनुवाद करुन या कथा ऑडियो क्लिपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.
संस्कार सुमनाचे २५० भाग सादर
बालवयातच मुलांची वैचारिक पातळी, कल्पनाशक्ती अन् आकलनक्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूरक असल्याचे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, मुख्याध्यापक प्रकाश दाणे, मुख्याध्यापक सुनील चिपाटे, मुख्याध्यापिका कमल मगरे, व्यंकट कोमटवार, शरद शहापूरकर आदींनी काढत शिक्षिका विद्या गवई यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
फोटो ओळ- विद्या गवई-नरवाडे (पाटोदा जि.प.शाळा शिक्षिका)
----------------------