औरंगाबाद : येथील धूत ट्रान्समिशन लिमिटेड (डीटीएल) या कंपनीने बंगळुरू येथील सॅन इलेक्ट्रोमॅक ही कंपनी टेकओव्हर केली आहे. रेल्वे, संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या वायर हार्नेसेसचे उत्पादन त्या कंपनीतून होते. ती कंपनी डीटीएलने ताब्यात घेतल्यामुळे औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. धूत ट्रान्समिशनने या सॅन इलेक्ट्रोमॅकसह चार विविध कंपन्यांचे टेकओव्हर आजवर केले आहे.त्यामध्ये यूके येथील पार्किन्सन हार्नेस टेक्नोलॉजी, स्कॉटलॅण्ड येथील टीएफसी केबल असेंब्लीज, अमेरिकेतील कारलिंग टेक्नॉलॉजीस कंपनीसोबतच्या संयुक्त भागीदाराच्या कराराचा समावेश आहे.
दुचाकीसाठी लागणारे वायरिंग हार्नेस मार्करचे उत्पादन करणारी डीटीएल ही भारतातील दुसरी अग्रगण्य कंपनी आहे.सॅन इलेक्ट्रोमॅकच्या बंगळुरू येथील प्रकल्पातून रेल्वे, संरक्षण, बांधकाम आणि विशेष वाहनांसाठी लागणारे वायर हार्नेस आणि कंट्रोल पॅनलचे उत्पादन केले जाते. मार्च २०१९ पर्यंत डीटीएलची वार्षिक उलाढाल १ हजार कोटींच्या आसपास जाईल. त्यातून पुढील ३ ते ५ वर्षांत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनी करील. डीटीएल १५ ठिकाणी हार्नेस, इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलिंग आॅटोमोटिव्ह स्वीचचे उत्पादन करते. यामध्ये औरंगाबाद, पुणे, मॅनेसर, इंदूर, चेन्नई, नवी दिल्ली, युनायटेड किंगडम, स्लोव्हाकिया आणि थायलंडमध्ये आदी ठिकाणंच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणे शक्य लोकमतशी बोलताना, धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत म्हणाले, सॅन इलेक्ट्रोमॅक आम्ही टेकओव्हर केल्यामुळे रेल्वे, रोड आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे वायरिंंग हार्नेस उत्पादनात डीटीएल आले आहे. तसेच कृषी क्षेत्रासाठी लागणारे वायरिंंगचे उत्पादन करणे शक्य होणार आहे. पार्किन्सन आणि सॅन इलेक्ट्रोमॅकच्या मदतीने डीटीएलला भारतीय आणि परदेशातील बाजारपेठेत जाणे शक्य होईल. बंगळुरू येथील सॅन इलेक्ट्रोमॅकच्या प्रकल्पामध्ये डीटीएलने ७५ कोटींची गुंतवणूक केली आहे. सदरील ग्रीनफिल्ड प्रकल्प असून, तेथे ४०० कर्मचारी आहेत, असेही धूत यांनी सांगितले.