औरंगाबाद : मुंबई ते नागपूर या ७०१ कि़ मी. अंतराच्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले असून, त्या महामार्गालगत खाजगी थांबे, हॉटेल्स व इतर बांधकामांना परवानगी मिळणे अवघड असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ त्या महामार्गावर २८ ठिकाणी अॅमेनिटीज् उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती महामंडळामार्फत देण्यात आली.
प्रत्येक ठिकाणी ३० एकर जागेत फूड प्लाझा, हॉटेल्स, ट्रामा सेंटर्स, बस-बे, ट्रक टर्मिनल्स, पेट्रोल पंप, पार्किंग व्यवस्था आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच लॅण्डस्केपिंग, टनेल लायटिंग, ब्रिज ब्युटीफिकेशन्स, पथदीप, डिजिटल फलकांची सुविधा देण्याचा दावा महामंडळाने केला. महामार्गावर २४ ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. त्या इंटरचेंजपासूनच महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहनाला जाणे शक्य होईल. इतरत्र कुठूनही महामार्गावर वाहन घेऊन जाता येणार नाही.
नॅशनल हायवेलगत ७५ मीटर अंतरावर बांधकाम परवानगी आहे. परंतु समृद्धी महामार्गाच्या दुभाजकापासून ज्याठिकाणी एमएसआरडीसीने नियोजन केलेली २८ ठिकाणे आहेत, तेथेच प्रवासी सुविधा असतील. त्यामुळे दुभाजकापासून कोणत्याही अंतरावर खाजगी बांधकामे होणे अवघड असणार आहे. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांसाठी १५० कि़ मी. वेगाने धावण्याची परवानगी आहे. त्यामुळे कुठेही वाहने थांबविणे अवघड असेल.
शून्य अपघात महामार्ग बनविण्याचा दावासमृद्धी महामार्ग शून्य अपघात महामार्ग बनविण्याचा दावा रस्ते विकास महामंडळाने केला आहे. यासाठी कोरियन सरकारकडून अर्थसाह्य होण्याची शक्यता रस्ते विकास महामंडळाने वर्तविली. वर्षभरानंतर अॅडव्हान्स इंटेलिजन्स ट्रॅफिक सिस्टीम मॅनेजमेंटचे काम सुरू करण्यात येईल. महामार्गावर ५० हून अधिक उड्डाणपूल असणार आहेत.
१८ ठिकाणी टाऊनशिप१८ ठिकाणी १ हजार हेक्टरमध्ये टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. १८ ठिकाणे नोटीफाईड करण्यात आली आहेत. ७ ठिकाणी लॅण्डपुलिंगच्या धर्तीवर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ नियोजन करणार आहे. ७ ठिकाणी ३ कन्सल्टंट काम करीत आहेत. त्या ठिकाणांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) कन्सल्टंट तयार करतील. औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ येथे ६०० हेक्टर जागा शासकीय असेल. ४०० हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, बुलडाण्यातील सिंदखेड राजा व मेहकर, जालना तालुका, ठाणे जिल्ह्यातील शहापूर टप्पा क्र.१, २, ३ अशा सात ठिकाणी कन्सल्टंट काम करणार आहेत.