वैजापूर : तालुक्यात गोदावरी काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणारे वाळूमाफिया मोकाट असून वीरगाव पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. माफिया फरार असल्याच्या नावाखाली पोलीस त्यांना ‘अभय’ देत असल्याचा संशय निर्माण होत आहे. तालुक्यातील गोदापात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. हायवा व ट्रकसारख्या मोठ्या अवजड वाहनामधून होणार्या वाळू वाहतुकीमुळे तालुक्यातील गंगथडी भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी गंगथडी भागात जाऊन पाहणी केली असता त्यांना गोदानदीच्या काठावर अनेक अवैध वाळूसाठे आढळून आले. त्यामुळे लवांडे यांनी स्थानिक संबंधित अधिकार्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन, वीरगाव पोलीस ठाण्याचे फौजदार सोनवणे, खनिकर्म अधिकारी, मंडळाधिकारी व तलाठी यांच्या पथकाने छापे टाकले होते. याप्रकरणी तालुक्यातील पुरणगाव येथील मधुकर ठोंबरे, रामा ठोंबरे, सूरज ठोंबरे, मनोठ ठोंबरे, मिथुन ठोंबरे, लाखगंगा येथील रमेश सोनवणे, प्रवीण तुरकणे, प्रभाकर पडवळ, बाभूळगावगंगा येथील सोपान तुरकणे, सुभाष तुरकणे, विठ्ठल तुरकणे, वाल्मीक तुरकणे, राजू बोराडे, जालिंदर कुंजीर व बाबासाहेब कुंजीर या १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या कारवाईस आठ दिवसांचा कालावधी उलटूनही हे सर्व वाळूमाफिया अजून मोकाट आहेत. आठ दिवसांत पोलिसांना एकही आरोपी पकडण्यात यश आले नाही. पोलिसांना आरोपी पकडणे फारसे अवघड नाही; परंतु आरोपी खरेच फरारी आहे की पोलिसांनीच त्यांना फरारी घोषित केले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) गेल्या सोमवारी महसूल अधिकार्यांनी तालुक्यातील पुरणगाव, लाखगंगा व बाभूळगावगंगा येथील गोदावरी नदीच्या काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणार्या १५ माफियांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून धडाकेबाज कारवाई केली होती. उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन व महसूल विभागाच्या अन्य कर्मचार्यांच्या पथकाने तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर १५ ठिकाणी छापे टाकून ४३ लाख रुपये किमतीची १४४० ब्रास अवैध वाळू जप्त केली होती. या प्रकरणी १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाळू जप्त झाली पण माफियांना पकडण्यात यश आलेले नाही. दरम्यान याबाबत वीरगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. एन. रयतूवार यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींचा आम्ही पुणतांबा, लाखगंगा, बाभूळगावगंगा, सावखेडगंगा, भालगाव व म्हस्की येथे शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते सापडत नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाळू तस्कर मोकाट
By admin | Published: May 13, 2014 12:36 AM