देवगाव रंगारी : येथील पोलीस उपनिरीक्षकाला अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी लाच देऊ करणाऱ्या वाळू तस्कराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शैलेश उद्धवराव जोगदंड यांना वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणारा गोकुळ बाळासाहेब सूर्यवंशी (४०, रा. बळेगाव, ता. वैजापूर) याने त्याचे दोन टेम्पो अवैध वाळू वाहतुकीसाठी चालवू द्यावेत. यासाठी प्रतिटेम्पो २५ हजार रुपयांची लाच देऊ केली. पोउनि. शैलेश जोगदंड यांना लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात सापळा रचून गोकुळ बाळासाहेब सूर्यवंशी याला २५ हजारांची लाच देताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई एस. एस. शेख (पोलीस निरीक्षक, जालना), पोलील कॉन्स्टेबल गणेश चेके, गजानन कांबळे, शेख जावेद, प्रवीण खंदारे यांनी केली.