सोनपेठ (परभणी ) : तालुक्यातील महातपुरी शिवारात अवैधरित्या वाळूची चोरटी विक्री करत असताना पकडलेल्या आरोपींनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी शेख गुलाब शेख इस्माईल, उमेश कचरे, सुनील कचरे, गंगाधर कचरे, कैलास वाघमोडे यांच्याविरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांच्या पथकाला मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील महातपुरी शिवारात वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. यावेळी आरोपींनी ट्रॅक्टर अडवून 'आम्ही पोलीसबिलीस काय मानत नाही, गाडी सोडा' असे म्हणत धक्काबुकी करत शिवीगाळ केली.
या प्रकरणी पोलीस शिपाई अनिल इंगळे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात पाचजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख गुलाब शेख इस्माईल, उमेश कचरे, सुनील कचरे, गंगाधर कचरे, कैलास वाघमोडे ( सर्व रा. महातपुरी ता. गंगाखेड ) अशी आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी हे करीत आहेत