औरंगाबाद: चंदनाच्या लाकडाला सोन्याचा भाव मिळत असल्यामुळे शहरातील विविध ठिकाणी असलेली चंदनाची झाडाची चोरटे तोडून नेत आहेत. वर्षभरात १२ तर तीन वर्षात सुमारे ४० झाडे तस्करांनी तोडून नेल्याचे समोर आले.
जिल्हाधिकारी यांचा बंगला, विभागीय आयुक्तालय, सुभेदारी विश्रामगृह , जिल्हा सत्र न्यायालय आदी महत्वाच्या ठिकाणाची कडक सुरक्षाकडे भेदून चंदन तस्करानी चंदनाची झाडे तोडून नेल्याच्या घटना घडल्या. शिवाय सामान्य नागरीकानी घराच्या अंगणात लावलेली आणि जीवापाड जपलेली चंदनाच्या झाडे चोरीला जाण्याच्या घटना चार , सहा दिवसाआड घडत आहेत. तस्करांवर कठोर कारवाई पोलीस प्रशासनाकडुन होत नसल्याने अकरा महिन्याच्या कालावधीत विविध ठिकाणाहून चंदनाची १० झाडे आणि तीन वर्षात ४० हुन अधिक झाडे तस्करानी तोडून नेल्याचे समोर आले. शहरात घरफोड्या, वाहनचोऱ्या सोबतच चंदन झाडांची चोरी सतत होत आहे. चंदन तस्करी करणाऱ्या एका चोरट्याला जवाहरनगर पोलिसांनी महिनाभरापूर्वी रंगेहात पकडले. तर पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून दोन तस्कराना अटक केली होती. चंदन तस्करांचा म्होरक्या इलियास मात्र आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. यामुळे चंदन तस्करी थांबायला तयार नाही.
चंदन तस्करांविरूध्दची खटले प्रलंबितदोन वर्षापूर्वी आमदार अतुल सावे यांच्या खडकेश्वर येथील कार्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून नेणाऱ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आरोपी जमानत घेऊन बाहेर आले आहेत. तर चंदन तस्करी करणाऱ्या आरोपीना शिक्षा लागल्याचे एकही ताजे उदाहरण नाही. यामुळे चंदन तस्कर अटकेला न घाबरता संघटितपणे चंदनाची झाडे शोधून तोडून नेत असल्याचे दिसून येते.