सोयगाव : शहरातील शिवाजी चौक भागात सोमवारी पहाटेच्या सुमारास मध्यरात्री नाका बंदीच्यादरम्यान सोयगाव पोलिसांना चंदनाची अवैध वाहतूक करणारे वाहन आढळून आले. या वाहनाची पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ पोलिसांनी तपासणी केली असता वाहनात ५० किलो वजनाचे चंदन आढळून आले. यादरम्यान अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार झाला असून, दुसऱ्यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चंदनासह छोटा टेम्पो जप्त केला आहे.
सोमवारी पहाटे छोट्या टेम्पोतून (एम.एच. २८ ए. बी २५६४) चंदनाची वाहतूक होत होती. या वाहनास संशयावरून पोलिसांनी तपासणीसाठी थांबविले असता टेम्पोत ५० किलो चंदन आढळून आले. यातील आरोपी गौसखा गफूर खा पठाण (४५), जाकिरखान अब्दुलखान पठाण (३५, दोेघे, रा.कठोरा बाजार ता.भोकरदन) या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून गौसखा गफूर खा पठाण यास पकडून अटक केली. जाकिर खान अब्दुल खान पठाण फरार होण्यास यशस्वी ठरला. सोमवारी सोयगाव न्यायालयासमोर त्यास हजर केले असता त्यास एका दिवसाच्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.