औरंगाबाद: व्हिआयपी आणि व्हिव्हीआयपींची वर्दळ असलेल्या सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारातील चंदनाचे किमती झाड चोरट्यांनी तोडून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ही घटना गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थातील चंदनाचे झाड चोरट्यांनी पळविणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती.
याविषयी अधिक माहिती अशी की, सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात चंदनाची पाच झाडे आहेत. तेथील काही झाडे चंदनतस्करांनी तोडून नेले होती. यामुळे आणखी झाडे चोरीला जाऊ नये याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाने चंदनाच्या खोडाला सुमारे सहा फुट सिमेंटचा वटा तयार केला आहे. तेव्हापासून चंदनाची झाडे सुरक्षित आहेत, असा समज अधिकाऱ्यांचा झाला होता. मात्र बुधवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी तेथील एक पाच ते सहा वर्षाचे चंदनाचे झाड कापून नेले. विशेष म्हणजे सिमेंटचा वट्यापासून वरचे खोड चोरट्यांनी नेले. उर्वरित झाडाच्या फांद्या तेथेच पडू दिल्या. गुरूवारी सकाळी तेथील कर्मचाऱ्यांना ही बाब समजली. सा.बां.विभागाचे शाखा अभियंता बी.आर. चौंडिये हे कार्यालयात आले तेव्हा चोरट्यांनी चंदनाचे झाड पळविल्याची घटना त्यांना समजली. या घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली.यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.