औरंगाबाद : ब्रिजवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेतील मानाच्या कुस्तीत जालन्याचा संदीप कोल्हे व हर्सूलचा अजहर पटेल संयुक्त विजेते ठरले.नामांतर लढ्यात सतत रस्त्यावर संघर्षासाठी दाखल होणाऱ्या ब्रिजवाडी नागरिकांच्या वतीने विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या दंगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक आखाड्यात दाखल झाली. या कुस्त्याच्या दंगलीला दहा रुपयांपासून सुरुवात करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील दिग्गज मल्लही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ८० वर्षांच्या ज्येष्ठ मल्लांनीही नोंदवलेला सहभाग या कुस्त्यांच्या दंगलीत आकर्षण ठरले.मानाची कुस्ती जालन्याचा संदीप कोल्हे व अजहर पटेल यांच्यात रंगली. दोन्ही मल्लांनी डाव प्रतिडाव टाकताना उपस्थितांची मने जिंकली. तथापि, दोन्ही मल्ल निर्णायक विजय मिळवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना संयुक्तरीत्या विजेते घोषित करण्यात आले. यावेळी मातोश्री वेणूबाई कुंडलिक हिवराळे व सांडूबाबा हिवराळे यांच्या स्मरणार्थ मायादेवी बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे संदीप व अजहर यांना गौरविण्यात आले.सूत्रसंचालन सुभाष हिवराळे यांनी केले. पंच म्हणून जनार्दन पवार, राजू परदेशी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष काकासाहेब पट्टेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब नरवडे, सचिव मिलिंद निकाळजे, सहसचिव गणेश साबळे, रावसाहेब हिवराळे, अनिल भुईगड, कोषाध्यक्ष सुनील गडवे, संजय ढगे, आलमनूर पठाण, राहुल पट्टेकर, अमोल गायकवाड, कृष्णा पाखरे, श्रीकांत हिवराळे, उज्ज्वल भालेराव, शहानूर पठाण, दामू दाभाडे, नामदेव निकाळजे, दामू पट्टेकर, अक्षय हिवराळे आदींनी परिश्रम घेतले.
मानाच्या कुस्तीत जालन्याचा संदीप, हर्सूलचा पटेल संयुक्त विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:56 AM