वाळूज महानगर : वाळूज येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या केंद्र्रात रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, शनिवारी पहिल्याच दिवशी ४२ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
वाळूज येथे जवळपास साडे पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करुन अद्ययावत असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. याचे शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या आरोग्य केंद्र्रामुळे परिसरातील वाळूज, नारायणपूर, शिवराई, नायगाव, बकवालनगर, रामराई, कमळापूर, रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेवाव, विटावा आदी भागातील नागरिकांना उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी ४२ रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधी देण्यात आली.
या आरोग्य केंद्रात डॉ.सतीश राठोड, डॉ. हुमेरा खान, डॉ. चित्रा बिºहाडे या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच बरोबर चार आरोग्य सेविका, एक औषध निमार्ता तसेच रक्त तपासणी प्रतिनियुक्तीवर टेक्निशीअनची नियुक्ती करण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके यांनी सांगितले.
या परिसरातील रुग्णांच्या सुविधेसाठी दररोज सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत बाह्यरुग्ण विभाग सुरु ठेवण्यात आला आहे. या आरोग्य केंद्रात चिकलठाण येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातुन खाटा व आवश्यक साधन सामुग्री मागविण्यात आली आहे. रुग्णांसाठी आवश्यक औषधीचा साठाही या आरोग्य केंद्रात ठेवण्यात आल्यामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे.