औरंगाबाद : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०१६-१७ या वर्षातील राज्यस्तरीय २५ लाख रुपयांचा पहिला पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार ग्रामपंचायतीने पटकावला, तर २० लाखांचा द्वितीय पुरस्कार सातारा जिल्ह्यातील माण्याचीवाडी व नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांकाचा १५ लाखांचा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील घाटाव, ता. रोहा व चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड, ता. मूल यांना विभागून देण्यात आला.औरंगाबाद येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पोपटराव पवार आदींची उपस्थिती होती. औरंगाबाद विभागात लातूर जिल्ह्यात धामणगावने १० लाखांचा प्रथम, तर ८ लाखांचा द्वितीय पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी ग्रामपंचायतीला मिळाला. नाशिक विभागात हिवरेबाजारला प्रथम, तर दिंडोरी तालुक्यातील अवनखेडला द्वितीय पुरस्कार मिळाला. अमरावती विभागात पांगारखेडने (ता. मेहकर) प्रथम, तर अमरावती जिल्ह्यातील देवगावला द्वितीय पुरस्कार मिळाला. नागपूर विभागात भंडारा जिल्ह्यातील शिवनी मो. (ता. लाखणी) प्रथम, तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड (ता. मूल) ग्रामपंचायतीला द्वितीय पुरस्कार मिळाला. पुणे विभागात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीला प्रथम, तर द्वितीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडीला (ता. खेड) मिळाला. कोकण विभागात रायगड जिल्ह्यातील धाटाव ग्रामपंचायतीला (ता. रोहा) प्रथम, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंदुर्ले (ता. कुडाळ) ग्रामपंचायतीला द्वितीय पुरस्कार देण्यात आला.>विशेष पुरस्कार प्रदानपाणी व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३ लाखांचा वसंतराव नाईक पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील अवनखेड (ता. दिंडोरी) ग्रा.पं.ला मिळाला. कुटुंबकल्याण क्षेत्रात ३ लाखांचा आबासाहेब खेडकर पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील देवगावला, तर सामाजिक एकतेसाठी ३ लाख रुपयांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार बुलडाणा जिल्ह्यातील पांगारखेड (ता. मेहकर) ग्रामपंचायतीने पटकावला.
स्वच्छता अभियान पुरस्कार : हिवरेबाजार राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:07 AM