परभणी: महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी नागरी दलित वस्ती, पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबियांना नळजोडणी व वैयक्तिक शौचालय योजनेस मंजुरी मिळाल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.या योजनेअंतर्गत परभणी शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकामधील कुटुंबियांना खाजगी नळ जोडणीसाठी प्रतिकुटुंब ४ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तर वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत खाजगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय उपलब्ध करुन देण्यासाठी ९० टक्के शासकीय अनुदान मिळणार असून १० टक्के रक्कम संबंधित लाभार्थ्यांचा वाटा राहणार आहे. तसेच शहरातील प्रभागामध्ये जलवाहिनी टाकण्यासाठी २ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील २ हजार ८५० लाभधारकांना लाभ होणार असून यासाठी १ कोटी १४ लाख रुपये तर २ हजार ७२३ वैयक्तिक शौचालयासाठी १२ हजार रुपयांप्रमाणे ३ कोटी २७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
शौचालय, नळजोडणी योजनेस मंजुरी
By admin | Published: September 08, 2014 12:01 AM