नांदेड : येथील बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani Murder) यांची भरदिवसा गाेळ्या घालून हत्या करणारे मारेकरी नमस्कार चाैकामार्गे बियाणींच्या घरापर्यंत पाेहाेचल्याचे व त्याच मार्गाने माळटेकडीकडे परत गेल्याचे पाेलिसांनी केलेल्या सीसीटीव्हीच्या तपासणीत आढळून आले आहे.
बिल्डर संजय बियाणी यांची मंगळवार ५ एप्रिल राेजी सकाळी ११ वाजता त्यांच्या घरासमाेर दुचाकीवरून आलेल्या दाेन मारेकऱ्यांनी गाेळ्या झाडून निर्घृण हत्या केली. यातील मारेकऱ्यांचा व नेमक्या कारणांचा अद्याप शाेध लागलेला नाही. पाेलीस मात्र ठाेस काही सुगावा (क्ल्यू) मिळताे का याच्या प्रयत्नात आहेत. खुनाच्या घटनेनंतर पाेलिसांनी मारेकरी नेमके काेठून आले याचा शाेध घेण्यासाठी बियाणी यांच्या घराकडून जाणाऱ्या सर्व मार्गावरील सीसीटीव्हीची तपासणी केली. तेव्हा मारेकरी हे नमस्कार चाैक, राणा प्रताप चाैक, नागार्जुन हाॅटेल, पेट्राेल पंप, जिजाऊनगर मार्गे बियाणी यांच्या घरापर्यंत पाेहाेचल्याचे आढळून आले आहे. बियाणी यांचा खून केल्यानंतर हे मारेकरी नमस्कार चाैक मार्गेच माळटेकडीकडे परत जाताना दिसले. फ्रुट मार्केटवरून बायपासने ते पुढे गेले. परंतु पुढे ते नागपूरकडे गेले, हिंगाेलीकडे की, हदगावकडे हे मात्र अद्याप निष्पन्न झालेले नाही. विशेष असे घटनेच्या वेळी मारेकऱ्यांनी आपले ताेंड कापडाने झाकले हाेते. परंतु परत जाताना त्यांनी ती कापडे काढून टाकली. त्यांच्या चेहऱ्यावर केवळ मास्क असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.
घटनेच्या वेळी आराेपींनी वापरलेल्या माेटारसायकलचा क्रमांक शाेधण्याचा प्रयत्न पाेलिसांनी केला. मात्र हे वाहन विनाक्रमांकाचे असल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी आतापर्यंत रेकाॅर्डवरील ५२ जणांची चाैकशी केली. मात्र ठाेस काही निष्पन्न झाले नाही. संजय बियाणी यांच्या खुनामागे खंडणी-धमकी, रियल इस्टेट-गुंतवणूक, अलीकडेच मिळालेले काेट्यवधींच्या कामाचे कंत्राट, साडेचार एकर जागेच्या विकासाचे नियाेजन ही कारणे आहेत की, आणखी वेगळेच कारण आहे, याचा शाेध पाेलीस घेत आहेत. मात्र लवकरच खुनाचे कारण व मारेकरी निष्पन्न हाेतील, असा विश्वास पाेलीस व्यक्त करीत आहेत.
‘एसआयटी’ने बनविली पाच तपास पथकेसंजय बियाणी यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. अप्पर पाेलीस अधीक्षक विजय कबाडे हे एसआयटीचे प्रमुख आहेत. एसआयटीची एकूण पाच पथके या खुनाच्या तपासासाठी कार्यरत आहेत. इतर जिल्ह्यातही या पथकांनी तपास चालविला आहे. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखा व विमानतळ पाेलीसही समांतर तपास करीत असले तरी त्यांचे रिपाेर्टिंग एसआयटी प्रमुखालाच आहे.
दोन चालक आहेत खुनाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संजय बियाणी यांच्या खून प्रकरणात दाेन जण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. यातील एक हा बियाणी यांच्या वाहनाचा चालक. घटनेच्या वेळी मारेकऱ्यांना पाहून ताे स्टेअरिंगखाली लपला हाेता, अशी माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. तर, यावेळी घराचे गेट उघडायला आलेला दुसरा चालक मारेकऱ्यांनी गाेळी झाडल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे दाेघे या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. याशिवाय घटनास्थळी आणखीही काहींनी ही घटना पाहिल्याने त्यांची साक्षीदार म्हणून नाेंद केली जाणार आहे.
तांत्रिक माहितीचे करणार आजपासून विश्लेषणखुनाच्या घटनेनंतर गेली दाेन दिवस पाेलिसांनी या प्रकरणाशी संबंधित विविध प्रकारची माहिती संकलित केली. टाॅवर लाेकेशनवरून त्यावेळी तेथे ऑपरेट झालेल्या माेबाईल क्रमांकाची माहितीही मिळविली गेली. शुक्रवारपासून या माहितीचे पाेलीस अधिकारी विश्लेषण करणार आहेत. त्यानंतर तपासाची दिशा निश्चित हाेण्याची शक्यता पाेलीस सूत्रांनी वर्तविली.
दोन गाेळींचे शरीरात झाले तुकडेपाेलीस सूत्रांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी झाडलेल्या एकूण सहा गाेळ्या संजय बियाणी यांच्या शरीरात शिरल्या. त्या मानेत व छातीत हाेत्या. मात्र त्यातील दाेन गाेळ्यांचे शरीराच्या आत तुकडे झाले आहेत. मारेकऱ्यांनी वापरलेले अग्निशस्त्र हे देशी कट्टा की विदेशी बनावटीचे याबाबत पाेलिसांमध्ये संभ्रम पाहायला मिळताे. उत्तरीय तपासणी अहवाल व बॅलेस्टीक एक्सपर्टच्या अहवालानंतरच ही बाब स्पष्ट हाेणार आहे.