ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 24 - प्लॉट,रो हाऊस फ्लॅट आणि जमिनीमध्ये भागीदारी देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाची ८ कोटी ६१ लाख ८०हजार २८४ रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर संजय कासलीवाल यांच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा मागील काही महिन्यांपासून या तक्रारीची चौकशी करीत होती.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, मूळचे जालना येथील रहिवासी पंकज अग्रवाल (३३) हे शहरातील वेदांतनगर येथे स्थायिक झाले आहे. आरोपी संजय कासलीवाल यांनी तक्रारदार याच्या वडिलांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून सप्टेंबर- नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्या बदल्यात शहरात आणि लगतच्या ठिकाणची मालमत्ता देण्याचे कबुल करुन त्यांच्याकडून ८ कोटी ६१ लाख ८० हजार २८४ रुपये घेतले.
या मालमत्तेची नोंदणीकृत रजिस्ट्री करुन देण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. याविषयीचा ई-मेल त्यांनी तक्रारदार अग्रवाल यांना पाठविला. तसेच काही धनादेश दिले. दरम्यान तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांनी तक्रारदार यांनी कासलीवाल यांच्याकडे ठरल्याप्रमाणे मालमत्तेची रजिस्ट्री करुन देण्याचे सांगितले. मात्र त्यांनी रजिस्ट्री करुन दिली नाही. आणि धनादेश बँकेत टाकू नका, रक्कम आज देतो, उद्या देतो, असे केले.
यानंतर अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे करीत होते. दरम्यान याप्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविण्याची कारवाई क्रांतीचौक ठाण्यात सुरू होती.
याविषयी बिल्डर कासलीवाल यांना विचारले असता ते म्हणाले की, हा सावकारीचा व्यवहार होता आणि तो पूर्णही केला. नंतर दुस-या व्यवहारासाठी अग्रवाल यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यासाठी आमची प्रॉपर्टी तारण ठेवण्याची तयारी दर्शवून याविषयीचा ई-मेल पाठविला होता. मात्र, हा व्यवहारच न झाल्याने त्या प्रॉपर्टीचा नोंदणीकृत करारनामा करण्याचा प्रश्नच नाही. यात कोणताही गुन्हा नसल्याचे ते म्हणाले.