वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींचा मनपा हद्दीत समावेश करण्यात येऊ नये, यासाठी संत गाडगेबाबा ग्रामपंचायत बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी आ. संजय शिरसाट यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. याप्रसंगी आ. शिरसाट यांनी या भागातील ग्रामपंचायतींचा मनपातील समावेशाला विरोध असल्यामुळे त्या मनपामध्ये समाविष्ट केल्या जाणार नसल्याचे सांगितले.
वाळूज महानगर परिसरातील ७ ग्रामपंचायती तसेच या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांचा मनपा हद्दीत समावेश करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्या आहेत. मनपामुळे कराचा बोजा वाढणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेचे अस्तित्व संपणार असल्याने ग्रामपंचायतींचा मनपा हद्दीत समावेश करण्यास परिसरातील नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. मनपा समावेश विरुद्ध वाळूज महानगर संत गाडगेबाबा ग्रामपंचायत बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून प्रशासनाच्या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. रविवारी कृती समितीचे अध्यक्ष राजेश कसुरे, सचिव सचिन गरड, राजेश साळे, उपजिल्हा प्रमुख बप्पा दळवी, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, बाळासाहेब गायकवाड, शशीकांत ढमढेरे, सुनील काळे, किशोर खांडरे, देविदास जाधव, पोपट हंडे आदींच्या शिष्टमंडळाने आ. संजय शिरसाट यांची भेट घेतली.
प्रशासनाकडून स्थानिक ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी तसेच नागरिकांना विश्वासात न घेता परस्पर हस्तांतराची प्रकिया सुरु केल्याचा आरोप कृती समितीने केला.
मनपा हद्दीत समाविष्ट होणार नाही
आ. संजय शिरसाट यांनी वाळूज महानगरातील ग्रामपंचायतीचा महानगरपालिका हद्दीत समावेश केला जाणार नसल्याची ग्वाही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. ग्रामपंचायतीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून प्रशासनाकडून हस्तांतरणाची प्रकिया सुरु केली नसल्याचे सांगितले. या भागातील ग्रामपंचायतीचे अस्तित्व कायम राहणार असून मनपा समावेशाच्या केवळ चर्चा सुरु असल्याने नागरिक व पदाधिकाऱ्यांनी घाबरुन न जाता, गावाच्या विकासाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.
फोटो ओळ- वाळूज महानगरातील ग्रामपंचायतीच्या मनपा हद्दीत समावेश करण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन आ. संजय शिरसाट यांना सादर करताना कृती समितीचे अध्यक्ष राजेश कसुरे, सचिन गरड, राजेश साळे, हनुमान भोंडवे आदी.
फोटो क्रमां- निवेदन १/२
-------------------------