छत्रपती संभाजीनगर : शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांचे उद्धवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजू शिंदे यांचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव करीत विजयाचा चौकार मारला. निवडणुकीची मतमोजणी चौथ्या टप्प्यात असतानाच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शनिवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली. शिंदेसेनेचे प्रवक्ता आ.संजय शिरसाटविरुद्ध उद्धवसेनेचे राजू शिंदे अशी ही निवडणूक झाल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. आमदार शिरसाट मागील पंधरा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी त्यांना जोरदार झुंज दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रात १४ टेबलवर २९ फेऱ्या झाल्या. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राजू शिंदे यांना ५,६२२, तर शिरसाट यांना ५१०५ मते मिळाली होती. पहिल्या फेरीत शिंदे यांनी ५१९ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर आ.शिरसाट मागे राहिले नाही. दुसऱ्या फेरीत त्यांना एकूण १०,८०२ मते तर शिंदे यांना ८,२३९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीपासून ते शेवटच्या २९ व्या फेरीपर्यंत शिरसाट मते मिळविण्यात आघाडीवर होते. २९व्या फेरीची मतमोजणी संपली, तेव्हा शिरसाट यांना एकूण १ लाख २२ हजार ४९८ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मते मिळाली होती.