संकल्प ४५ हजार कोटींचा; मात्र मंजुरी ९ हजार कोटींच्या कामांना, सरकारनं काय दिलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 06:49 AM2023-09-17T06:49:11+5:302023-09-17T06:49:42+5:30
मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस, हिंगोलीला वैद्यकीय महाविद्यालय
छत्रपती संभाजीनगर : येथे शनिवारी झालेल्या बहुचर्चित मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडा विकासाच्या तब्बल ४५ हजार कोटींच्या भरघोस कामांचा संकल्प करण्यात आला. प्रत्यक्षात नऊ हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पत्रपरिषदेत निर्णयांची माहिती दिली. मराठवाड्यातील अकरा सिंचन प्रकल्प आणि त्यासाठी १३ हजार ६७७ कोटी सुधारित खर्चासही या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध संस्था, संघटनांनी मोर्चे, निवेदनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
मराठवाड्यात ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा वाढीव खर्च
ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाख महिलांना लाभ.
अंबाजोगाईत लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन
छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना
हिंगोलीमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय. ४८५ कोटी खर्चास मान्यता
राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना ८५ हजार रुपये दरमहा मानधन. १२.८५ कोटी
सौरऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार
समग्र शिक्षातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना १०% मानधनवाढ
राज्यातील शाळा दत्तक घेता येणार. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय
सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय
परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय, सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र
सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय
नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार, १० कोटीस मान्यता
गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबईत भूखंड
राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान
२००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि २००९ मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ
या प्रकल्पांना मंजुरी
अंबड प्रवाही वळण योजना (ता. दिंडोरी),
निम्न दुधना प्रकल्प (ता. सेलू, जि. परभणी),
जायकवाडी टप्पा-२ (ता. माजलगाव, जि. बीड),
बाभळी मध्यम प्रकल्प (जि. नांदेड),
वाकोद मध्यम प्रकल्प, (ता. पुसद, जि. यवतमाळ),
पोटा उच्च पातळी बंधारा (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली),
जोडपरळी उच्च पातळी बंधारा (ता. वसमत, जि. हिंगोली),
पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा (ता. वसमत, जि. हिंगोली),
ममदापूर उच्च पातळी बंधारा (ता. पूर्णा, जि. परभणी),
उनकेश्वर उच्च पातळी बंधारा (ता. किनवट, जि. नांदेड).
१४ हजार कोटींची तरतूद ही थाप
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी १४ हजार कोटी रुपयांची घोषणा म्हणजे निव्वळ थाप आहे. या योजनेच्या सर्वेक्षण करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात आले आहे. अद्याप सर्वेक्षणच झाले नाही, तर १४ हजार कोटी रुपयांची तरतूद कोणत्या कामासाठी केली, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला.