बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: मस्साजोगचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेला १९ दिवस झाल्यानंतरही आरोपींना अटक होत नाही. त्यांचा म्होरक्या वाल्मिक कराड कुठे पळाला, त्याला अजून अटक झाली नाही. नुसता मोक्का लावतो असे विधानसभेच्या पटलावर म्हणून चालणार नाही, तर संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केली.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड येथे आयोजित सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे शुक्रवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड या म्होरक्याला सरंक्षण देणाऱ्या मंत्री धनंजय मुंडेनी अद्याप राजीनामा का दिला नाही. ही घटना समोर आल्यानंतर मुंडे यांना मंत्री करू नये, अशी भूमिका आपण घेतली होती. आता त्यांना मंत्री केले आहे. तर या घटनेमागे असलेल्या वाल्मिक कराडला अटक का होत नाही?", असा सवाल त्यांनी केला.
"झटपट निर्णय घेणारे अजितदादा पवार यांना बीडमध्ये जे सुरू आहे ते पटते का? ही लढाई जातीवादाची नाही. तर माणुसकीची आहे, त्यामुळे आपण या आंदोलनात सहभागी झालो आहोत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करा. आज संतोष यांची हत्या झाली. उद्या आणखी किती लोकांची होऊ शकते, याचा विचार करा. बीड मध्ये वाटप करण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांचा आकडा पाहून आश्चर्य वाटते," असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर होते.
वाल्मिक कराड कुठे हे धनंजय मुंडेला माहिती
वाल्मिक कराड कुठे लपला हे धनंजय मुंडे यांना माहिती असेल. कारण वाल्मिक शिवाय धनंजयचे पान सुद्धा हालत नाही, असे पंकजा ताईंनी जाहीर सभेत सांगितले आहे. अनेक व्यवसायात दोघे भागीदार आहे. धनंजयचा मुख्यत्यारनामा वाल्मिकच्या नावे आहे, असे ते म्हणाले.