छत्रपती संभाजीनगर : दगडाला पाझर फुटत नाही, असे म्हटले जाते; पण जेव्हा याच दगडातून सप्तसूर बाहेर पडतात तेव्हा... तुम्ही म्हणाल ‘आता हे काय नवीन.’ मात्र, हे नवीन काहीच नाही, जुनेच आहे. सुलीभंजन पर्वतावर एक ‘शिळा’ अशी आहे की, तिच्यावर छोट्या दगडाने वाजविले, तर असा सप्तसूर निर्माण होतात. होय, जिथे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांना साक्षात भगवान दत्तात्रेयांनी दर्शन दिले होते. आता तुमच्याही मनात सुलीभंजन पर्वताला भेट देण्याचे कुतूहल निर्माण झाले असेल.
छत्रपती संभाजीनगरापासून अवघ्या ३० ते ३५ कि.मी. अंतरावर खुलताबादकडून वेरूळकडे जाताना डाव्या हाताला वळल्यास सुलीभंजन पर्वताकडे जाण्याचा रस्ता दिसतो. श्री दत्ताच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेल्या या जागेवर आता मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरासमोरच संजीवनी शिला नावाची पाटी दिसते. तिथे असलेल्या एका भव्य आकारातील दगडावर सर्वांचे लक्ष जाते. पांढऱ्या रंगाच्या शिळेवर असंख्य छिद्र पडलेले दिसाता. याच शिलेवर एक छोटासा दगड ठेवण्यात आला आहे, तो लहान दगड घेऊन त्या शिळेवर वाजविले, तर घंटीसारखा ‘टन टन’ आवाज येतो, दगडाच्या वेगवेगळ्या भागात वाजविले, तर सप्तसूर बाहेर पडतात. हे अनुभवून भाविक अचंबित होतात. बच्चे कंपनी तर जाम खुश होऊन जाते. मागील अनेक वर्षांपासून शिळा तेथेच आहे. येथे दर्शनासाठी येणारा असा कोणताही भक्त नसेल त्याला याविषयी कुतूहल निर्माण झाले नसेल. यामुळेच प्रत्येक जण या शिळेवर दगडाने वाजवतो व सप्तसुरांचा आनंद घेतो.
त्या शिळेमागे विज्ञानचसंत एकनाथ महाराजांचे गुरू संत जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार होते. तेव्हा दर गुरुवारी ते आपल्या आवडत्या शिष्याला घेऊन सुलीभंजन पर्वतावर जात. तिथे नाथ महाराज साधना करीत. त्याचठिकाणी त्यांना श्री गुरुदत्ताचे दर्शन घडले. पोथ्या, पुराण व शिलालेखांचा अनेक वर्षे अभ्यास केला व नंतर ती जागा शोधून काढली, ती म्हणजे तपोभूमी श्रीक्षेत्र सुलीभंजन पर्वत याच ठिकाणी एक मोठा दगड आहे. त्यातून सप्तसूर निघतात. या पाठीमागील विज्ञान काय आहे, हे शोधणे आवश्यक आहे.- डॉ. कुमुद गोसावी, नाथ वंशज
ज्वालामुखीतून तयार झालेला खडकसुमारे ६५ हजार कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखी झाला होता. त्यातून निर्माण झालेल्या खडकास ‘बेसाल्ट’ असे म्हटले जाते. शहरातून उत्तर बाजूने जो डोंगर जातो त्यास दख्खन का पठार म्हणतात. तो ज्वालामुखीतून निर्माण झालेला आहे. लाव्हारस बाहेर आल्यावर त्यात वेगवेगळे वायू असतात. धर्तीवरील वातावरण थंड असल्याने लाव्हारसाचा पृष्ठभाग लवकर थंड होतो; पण आत वायू असल्याने दगडाच्या आतून पोकळी निर्माण होते. यामुळे त्या दगडावर लहान दगडाने वाजविले तर ‘टन टन’ आवाज निर्माण होतो. सुलीभंजन पर्वतावरील तो दगड म्हणजे ‘बेसाल्ट’ होय.-प्राचार्य अशोक तेजनकर, भूवैज्ञानिक