लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सिल्लोड येथील सोनार आपले गोळेगाव येथील सराफा दुकान बंद करुन सिल्लोडकडे दुचाकीवरुन जात असताना पाळत ठेवून दुचाकीवरुनच आलेल्या दोन अनोळखी दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर पिस्टल रोखून बेदम मारहाण केली व १२ तोळे सोने, एक किलो चांदी, रोख ९० हजार रुपये असा एकूण अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान, याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराने सोनाराला मदत करण्याचा प्रयत्न केला असता या दरोडेखोरांनी त्यांच्यावर गावठी पिस्टलमधून गोळ्या झाडून त्यास गंभीर जखमी केले. ही थरारक घटना औरंगाबाद -जळगाव महामार्गावरील गोळेगाव येथे शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सोनारासह दोन जण जखमी झाले.या घटनेत पिस्टलच्या मागील भागाने डोक्यात प्रहार केल्याने राज ज्वेलर्सचे मालक सुनील उर्फ विजय दुळकीकर (४०, रा. टिळकनगर, सिल्लोड) व मदतीसाठी आलेले दुचाकीस्वार नामदेव नारायन मुळे (५१, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड) हे गोळ्या लागल्याने जखमी झाले. सुनील दुळकीकर दुकान बंद करुन गोळेगाव येथून सिल्लोड येथे दुचाकीवरुन (एम. एच. २०-ईएच-३०८४) जात होते. याचवेळी गोळेगाव येथील बीएसएनएल कार्यालयासमोर त्यांना या दरोडेखोरांनी अडवून त्यांच्या हातात असलेली १२ तोळे सोने, एक किलो चांदी व रोख रक्कम ९० हजार रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र दुळकीकर यांनी विरोध केला असता एकाने त्यांच्या डोक्यात पिस्टलच्या मागील भागाने प्रहार केल्याने दुळकीकर हे त्यांच्या दुचाकीवरुन खाली कोसळले. ही लुटमार प्रकरण सुरु असताना सिल्लोड येथून लग्न आटोपून गोळेगाव येथे जात असलेले नामदेव नारायन मुळे घटनास्थळी थांबून मदतीसाठी धावले. परंतु आरोपींनी त्यांच्या पायावर गावठी पिस्टलमधून दोन गोळ्या झाडल्याने तेही खाली कोसळले. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दुळकीकर यांच्या हातातील बॅग हिसकावून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच भाजप नेते सुरेश बनकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर त्वरित डॉक्टरांनी उपचार केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी कर्मचाºयांसह धाव घेतली. यावेळी नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.आरोपींनी जळगाव -औरंगाबाद रस्त्यावर बेधुंद गोळीबार केला. यामुळे रस्त्यावर एक काडतूस पोलिसांना सापडले आहे.चोहीकडे केली नाकाबंदीघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन सिल्लोड शहर, ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी चोहीकडे नाकाबंदी केली असून ठिकठिकाणी पथक पाठविण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी दिली.
सराफाला बेदम मारहाण करुन लुटले : गोळीबारात दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:53 AM