औरंगाबाद : शासनाने इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल पोर्टलवर अपडेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर राज्यभरातील शाळांनी एकाचवेळी अपडेशनची लगबग सुरू केल्यामुळे सलर पोर्टलचे सर्व्हर हँग झाले. त्यामुळे शाळांचे आधार कार्ड अपडेशन प्रक्रिया लटकली. ही बाब लक्षात आल्यानंतर आता विभागनिहाय अपडेशनचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
औरंगाबाद विभागासाठी ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील शाळांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजना लागू होतात. या योजनांचा लाभ घेण्यासह नावीन्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक आवश्यक असतो. शिवाय २०११ किंवा त्या नंतरच्या कालावधीत काढलेल्या आधार कार्डवर बायोमेट्रिक अपडेटचीदेखील गरज आहे. याशिवाय शासनाने विविध शासकीय योजनांसाठीदेखील आधार अपडेट करण्याचे निर्देश आहेत. त्यात प्रामुख्याने पोषण ट्रॅकर, मतदार यादीसोबत आधार अपडेट करण्यात येत आहे. एकापेक्षा अधिक शाळांमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे नाव दाखवून अनुदानाची लूट केली जात होती. हे प्रकार थांबविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक यूडायस प्रणालीवर अपलोड करण्याच्या सूचना दि. २१ आणि २९ जुलै रोजी शिक्षण आयुक्तांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ८ लाख ५० हजार ३६८ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ६ लाख ८९ हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड यूडायस प्रणालीवर अपडेट झाले, तर अजून १ लाख ६० हजार ८२३ विद्यार्थ्यांचे अपडेशन झालेले नाही. आता सरल पोर्टलवर शाळांनी रोज अपडेशनची प्रक्रिया न राबविता दिलेल्या वेळापत्रकानुसारच त्या त्या विभागांतील जिल्ह्यांनी ही प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बोगस विद्यार्थी पटसंख्येला आळा बसेल
सर्व स्वरूपाच्या शिष्यवृत्ती तथा योजनांचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. विद्यार्थी लाभाच्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी पटसंख्येला आळा बसेल. हा यामागे शासनाचा उद्देश आहे.- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी
अपडेशनचे विभागनिहाय वेळापत्रकविभाग तारीखलातूर २४ ते २६ ऑगस्टअमरावती २७ ते ३० ऑगस्टनागपूर १ ते ३ सप्टेंबरऔरंगाबाद ५ ते ७ सप्टेंबरकोल्हापूर ८ ते १० सप्टेंबरनाशिक १२ ते १४ सप्टेंबरमुंबई १५ ते १७ सप्टेंबरपुणे १९ ते २१ सप्टेंबर