औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन, उद्धघाटन सोहळा, प्रकट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद, नाटक अशा भरगच्च साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेश करपे यांनी दिली. या संमेलनात १७० पेक्षा अधिक सारस्वतांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे.
लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी शनिवारी (दि.२५) सकाळी ९.३० वाजता मावळते अध्यक्ष ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. १० वाजता संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होईल. संमेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार असून, यावेळी आमदार सतीश चव्हाण, मधुकरराव मुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. पहिल्या दिवशी सायंकाळी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत रवींद्र तांबोळी, गजानन जाधव, पृथ्वीराज तौर हे घेतील. १.३० वाजता दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये राजेंद्र गहाळ, बबन महामुनी, शंकर विभुते, विलास सिंदगीकर आणि अनिता येलमटे यांचा सहभाग असेल. सायंकाळी ४ वाजता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होईल. आयोजक समितीचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, समन्वयक डॉ. रामचंद्र काळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.
चौकट,
ज्वलंत विषयावर चार परिसंवाद
पहिल्या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ५ ते ७ वाजेदरम्यान विचारवंत जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे!’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल. यात ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर पाटील, संजय आवटे, अलका धूपकर, रवींद्र केसकर, वैजीनाथ अनमुलवाड सहभागी होतील. डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात सु. ग. चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’ या विषयावर परिसंवादाचे दुसरे पुष्प गुंफले जाईल. यात दीपा श्रीरसागर, राम रौनेकर, रवींद्र बेंबरे, संजय जगताप आणि मोहीब कादरी हे सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी ‘आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी !’ या विषयावर तिसरा आणि ‘मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे!’ या विषयावर चौथा परिसंवाद होईल.
चौकट,
दोन कविसंमेलने
पहिल्या दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर कवींचे संमेलन होईल. दुसऱ्या दिवशी १.३० नरसिंग इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कविसंमेलन होणार आहे. या दोन्ही कवी संमेलनात तब्बल ११० पेक्षा अधिक मराठवाड्यातील कवींचा सहभाग असणार आहे.