औरंगाबाद : लोकशाहीला हरताळ फासून प्रत्यक्ष मतदान न घेता सरपंच, उपसरपंच आणि ८ सदस्य एकूण २८ लाख ५६ हजार रुपयांची बोली लावून (लिलावाद्वारे) औरंगाबाद जिल्ह्यातील ‘सेलूद’ ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले. मात्र, ४ लाखांची बोली लावून निवडून आलेल्यांपैकी उपसरपंच राजू गणपत म्हस्के यांचा अंतरात्मा जागा झाला. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन निवडून आलेल्या ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून व सर्व पदाधिकाऱ्यांची निवड रद्द करून फेरनिवडणूक घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.
या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर ३ आठवड्यांनंतर पुढील सुनावणी आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात सेलूद ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जाहीर झाली. मात्र, प्रत्यक्ष मतदान न घेता ग्रामस्थांनी सभा बोलावून त्यात इच्छुक उमेदवारांनी पदनिहाय लाखो रुपयांची बोली लावली. सर्वाधिक बोली लावणारा उमेदवार त्या पदावर निवडून आल्याचे घोषित केले. सरपंच पदासाठी सर्वाधिक म्हणजे १४ लाख ५० हजार रुपये आणि उपसरपंचपदासाठी ४ लाख रुपये बोली लागली. तर उर्वरित ८ सदस्यपदांसाठी एकूण १० लाख ६ हजार रुपयांची बोली लागली होती. अशाप्रकारे पदाधिकाऱ्यांच्या बोलीद्वारे जमा झालेले २८ लाख ५६ हजार रुपये लाडसावंगी येथील नमोकार अर्बन को-ऑप. बँकेत जमा करण्यात आले. दरम्यान, निवडून आलेले उपसरपंच राजू म्हस्के यांनी वरीलप्रमाणे याचिका दाखल केली आहे.