छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख खून प्रकरण राजकीय भूमिका घेण्यापेक्षा संवेदनशील पध्दतीने हाताळले असते तर बरं झाले असते. या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला. बीडचे लोक स्वाभिमानी आहेत, उसतोड करुन पोट भरतात, कोणत्याही घटनेचे राजकारण करणाऱ्यांसाठी अशा घटना एक मंचच असतो, अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली.
मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंंत्री मुंडे म्हणाल्या की, पशुसवंर्धन आणि पर्यावरण विभागात खूप आव्हानात्मक काम आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. त्यांनी कारवाई केली असेल तर माझी काय प्रतिक्रिया असेल, असा प्रतिसवाल त्यांनी केला. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी आपण सर्वप्रथम केली होती.
संतोष देशमुख खून प्रकरणावरून बीड जिल्ह्याला बदनाम केले जात आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, कोणतीही घटना होऊ दे, अशा घटनांमध्ये ज्यांना राजकारण करायचे त्यांच्यासाठी हा एक मंचच आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत अजित दादा यांनी प्रतिक्रिया दिली असेल तर या विषयावर मी प्रतिक्रीया नोंदवणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदूषण विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणारप्रदूषण हा ग्लोबल विषय आहे. प्रदूषणाचा विषयावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे मंत्री पंकजा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, काही ठिकाणी हवेचे तर काही ठिकाणी पाणी प्रदूषणाचा जास्त आहे. प्रदूषण करणाऱ्या लोकांना नोटीसा देण्यात येइल. ज्यांनी कामात कचुराई केली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नदी पुनरूज्जीवनाचे काम करण्यात येणार आहे.