औरंगाबाद : शहरातील ७२ व्यापारी संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हा व्यापारी महासंघाने ‘व्यापार भवन’ उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी क्रांती चौक परिसरातील जागा निवडण्यात आली असून, त्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.
जिल्हा व्यापारी महासंघाची स्थापना १९८७ मध्ये झाली. आजघडीला ७२ व्यापारी संघटना व सुमारे २५ ते ३० हजार व्यापाऱ्यांचे महासंघ नेतृत्व करीत आहे. आजपर्यंत ८ अध्यक्षांनी या महासंघाचा धुरा समर्थपणे सांभाळला आहे. महासंघाचे स्वत:चे ‘व्यापारी भवन’ असावे यासाठी तत्कालीन अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी प्रस्ताव तयार केला होता. महासंघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी हे तेव्हा नगरसेवक होते. त्यांनीच ५ ऑक्टोबर २०१२ मध्ये हा प्रस्ताव मनपा सर्वसाधारण सभेत मांडला होता व मंजूरही झाला होता. त्यानुसार क्रांती चौक परिसरातील सर्व्हे नंबर ५४ मधील ६५२. ६५ चौ. मी. जागा ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मंजूर झाली व त्याची ४ लाखांची रजिस्ट्रीही करण्यात आली होती. त्यासाठी महासंघाने नगररचना विभागाकडे बांधकाम परवाना मिळण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता; परंतु नगररचना विभागाच्या अभिप्रायानुसार ही जागा सर्व्हे नं ५५ मध्ये येत असल्याने जागेसाठीचा करारनामा २०९९ मध्ये रद्द करण्यात आला. त्या बदल्यात पर्यायी जागा देण्याचे मनपाने लेखी कळविले होते. मध्यंतरी कोविड १९ मुळे महासंघाने याकडे लक्ष दिले नाही. मात्र, आता सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने पुन्हा एकदा ‘व्यापार भवन’ उभारण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी हालचाल सुरू केली आहे. यासंदर्भात मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, क्रांती चाैक परिसरातीलच सर्व्हे नंबर ५४ मधील जागेचा २९ वर्षांचा भाडेतत्त्वावरील नवीन प्रस्ताव मनपाला देत आहोत. त्यासाठी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे व सर्व प्रमुख पदाधिकारी शुक्रवारी मनपा प्रशासकांची भेट घेऊन त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
चौकट...............
दोन मजली भवन
व्यापारी महासंघाचे ‘व्यापार भवन’ हे दोन मजली असणार आहे. यात काही व्यापारी, उद्योग संघटनांचे कार्यालय, महासंघाचे कार्यालय, मिटिंग हॉल, सभागृह, अध्यक्ष व सचिव यांचे कॅबिन व कर्मचाऱ्यांचे कार्यालय असणार आहे.