औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १० वर्षांखालील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाड आणि सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे यांनी अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सार्थक गायकवाडने त्याच्याच शहरातील अरिहिंजय पाटील याच्यावर ४-०, ५-४ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे या सोलापूरच्या खेळाडूने पुणे येथील मृणाल शेळके हिच्यावर ४-०, ४-५, ५-३ अशी मात करीत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.त्याआधी सार्थक गायकवाड याने उपांत्य फेरीत पुणे येथील वीर महाजन याचा ६-२ आणि अरिहिंजय पाटील याने पुण्याच्या आयुष पुजारे याच्यावर ६-२ अशी मात केली होती, तर मुलींच्या गटातील सेमीफायनलमध्ये सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे हिने औरंगाबादच्या वृदिंका राजपूत हिचा ६-१ व मृणाल शेळके हिने सोलापूरच्या नम्रता पवारचा ६-१ असा पराभव केला होता. विजेत्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ऋतुपर्ण कुलकर्णी, आशुतोष मिश्रा व प्रवीण गायसमुद्रे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्य रँकिंग टेनिस स्पर्धेत सार्थक, पार्थसारथी अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:56 AM