छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे,यासाठी क्रांतीचौकात अकरा दिवसांपासून उपोषण करीत असलेल्या राजश्री उंबरे यांच्यावर त्या भाजपच्या पदाधिकारी असल्याचा आरोप झाल्यानंतर, आपण सहा महिन्यापूर्वीच भाजपच्या पदाचा राजीनामा दिल्याचे गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी राजीनामापत्रही पत्रकारांना दाखविले.
उंबरे म्हणाल्या, माझ्या वैयक्तिक आयुष्यावरही काही लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत. मुख्यत: शेती व्यवसाय करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. मराठवाड्यातील मराठा समाज हा हैदराबाद संस्थानात असताना कुणबी होता, असे असताना मराठवाड्यातील मराठा समाजाला खुल्या प्रवर्गात का टाकण्यात आले. आम्ही आमच्या हक्काचे १९ टक्के ओबीसीचे आरक्षण मागत आहे. राज्यातील अन्य प्रांतातील मराठा समाज प्रगतीशिल असूनही ते ओबीसीचे आरक्षण घेत आहे. यामुळे आमच्या समाजाच्या हक्कासाठी हे उपोषण करीत आहे. १७ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश न केल्यास १८ सप्टेंबरला तुमची लाडकी बहिण दिसणार नाही, असा इशाराही राजश्री यांनी राज्यसरकारला दिला.
वैयक्तिक आरोपापेक्षा समाजाचा प्रश्न महत्वाचामराठवाड्यातील मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी आपण उपोषण करीत आहे. मराठा आरक्षण हा आता राजकारणाचा विषय बनला आहे. प्रत्येक जण त्याला राजकारणाच्या चष्म्यातून पहातो, यातूनच मराठा समाज होरपळला जात आहे. यामुळे ४० वर्षापासून हा प्रश्न सोडविला जात नसल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्यावरही आता वैयक्तिक आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.