औरंगाबाद : सातारा गावाचे कुलदैवत खंडोबाच्या प्राचीन मूर्तीस नवीन डोळे बसविण्यात आले असून, देव्हाऱ्यात मूर्तीचे रूप खुलून दिसत आहे. हळदी- कुंकवाने मूर्तीच्या डोळ्यास तडे गेले होते, सदरील डोळे बदलून घ्यावेत अशी भाविक, ट्रस्ट मंडळी आणि ग्रामस्थांची मागणी होती. त्यासाठी पुरातत्व आणि धर्मादाय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून विभागाकडून रीतसर परवानगी घेतली होती. विश्वस्तांनी अखेर पुणे येथील मूर्तिकार परसेकर यांच्याकडे डोळे बनविण्याचे काम सोपविले होते. डोळे विशिष्ट प्रकारे बनविण्यात आले असून, नुकतेच विधिवतपणे मूर्तीस डोळे बसविले गेले. यावेळी अध्यक्ष गोविंद चोपडे, सचिव मोहन पवार, पुजारी विजय धुमाळ बंधू, पळसकर, सुभाष पारखे, दांडेकर, सोलट, बनगर, चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
साताऱ्याचे कुलदैवत खंडोबाचे डोळे बदलले
By admin | Published: October 22, 2014 12:20 AM