बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी बॅरीकेटस् लावून बंद केला होता. परंतु दिवाळीनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना जाण्यायेण्यास सुलभता व्हावी यासाठी रविवारपासून आठवडीरासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, यामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे अपघाताला निमंत्रण मिळू शकते अशी नागरिकातून चर्चा आहे. शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात अनेक अपघात झाले आहेत. नागरिकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या निदर्शनास वाहतूक पोलिसांनी आणून दिले होते. त्यामुळे जवळपास दोन महिन्यांपूर्वी हा चौक बंद करण्यात आला होता. चौकामध्ये बॅरीकेटस् लागल्यापासून एकही अपघात झाला नाही. हा निर्णय नागरिकांना आवडला नव्हता. मात्र, त्यांच्या अंगवळणी पडल्यानंतर नागरिक जालना रस्त्याला वळसा घालून सुभाष रस्त्यावर जात होते. मात्र, आता पोलिसांनी दिवाळीनिमित्त हा चौक खुला केला असल्याने शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे अपघाताचा धोका कायम आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, हा निर्णय सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू शकतो यात शंका नाही. (प्रतिनिधी)
साठे चौक आठवडभरासाठी खुला
By admin | Published: November 08, 2015 11:21 PM