औरंगाबाद : विद्यार्थीकाळातील अतृप्त असणारी इच्छापूृर्ती करण्यासाठी तब्बल २१ वर्षांनंतर विवाहितेला बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या लातूर येथील प्राध्यापकाला अटक करण्यात आली असून त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी सोमवारी दिले.
दीपक प्रल्हाद रणदिवे (४२) असे या प्राध्यापकाचे नाव आहे. औरंगाबादमधील एका शाळेत शिक्षिका असलेल्या पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ती २००० साली पुणे येथे महाविद्यालयात शिकत असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आरोपीने तब्बल २० वर्षांनंतर २०२० मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पीडिता व तिच्या पतीची माहिती काढली. त्यानंतर आरोपीने पीडितेला फोन केला व ओळख सांगत, तू मला अजूनही आवडतेस, असे म्हणाला. त्यावर पीडितेने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने २० वर्षांपूर्वी काढलेले पीडितेचे फोटो व्हायरल करण्याची तसेच पतीसह मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. मी एसएससी बोर्डाच्या विश्रामगृहात थांबत आहे, असे प्राध्यापकाने सांगितले. त्याने पीडितेला भेटण्याचा आग्रह धरला. धमकीने घाबरलेली पीडिता २१ डिसेंबर २०२० रोजी आरोपीला भेटण्यासाठी औरंगाबादेतील विश्रामगृहावर गेली असता आरोपीने जबरदस्तीने तीन वेळा अत्याचार केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशीही विश्रामगृहावर बोलावले.
१ मे २०२१ रोजी आरोपीने पीडितेला व्हिडीओ कॉल करून विचित्र मागण्या करू लागला. नेहमीच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्नदेखील केला होता. घटनेनंतर पीडितेने झालेला सर्व प्रकार पतीला सांगितला. ३ जून रोजी पीडितेने आरोपीला फोनवरील फोटो डिलीट कर, अन्यथा पोलिसात तक्रार करेल, अशी धमकीदेखील दिली. मात्र, आरोपीने पीडितेलाच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत, पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन दिवसांनी आरोपी हा पीडितेच्या घरासमोर फिरताना दिसला. त्यानंतर पीडितेने वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
चौकट...
आरोपीशी २० वर्षांपूर्वीची ओळख
२००० साली आरोपीशी पीडितेची ओळख झाली होती. आरोपी पीडितेला वारंवार लॅण्डलाइनवर फोन करून प्रेमाची गळ घालत होता, मात्र पीडितेने त्याला नकार दिला होता. त्यानंतरही आरोपी पीडितेला फोन करून भेटण्यासाठी बोलावत होता. कंटाळून एकदा त्याला भेटण्यासाठी गेली असता, आरोपीने तिच्याशी जवळीक साधत कॅमेऱ्यामध्ये फोटो काढले होते. ७ नोव्हेंबर २००१ रोजी पीडितेचे लग्न झाले. पीडितेला दोन अपत्ये आहेत.