औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमधील मृत्यूचे प्रमाण मागील तीन महिन्यांमध्ये झपाट्याने कमी झाले असून शहरात जुन् महिन्यात ५. ९४ टक्के म्हणजेच जवळपास ६ टक्के असलेला मृत्यूदर सप्टेंबर महिन्यात अवघा १. २२ टक्क्यांवर आला आहे. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे.
लॉकडाऊननंतर नागरिकांची रेलचेल वाढली. महापालिकेने संशयित रूग्ण शोधणे, त्यांची त्वरित तपासणी करणे आणि पॉझिटिव्ह रूग्णावर युद्धपातळीवर योग्य औषधोपचार करणे, या तीन महत्त्वाच्या बाबींवर सर्वाधिक भर देण्यात आला. आतापर्यंत शहरात तब्बल २ लाख ६० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. व्यापारी, बाहेरून येणारे प्रवासी, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यापक प्रमाणात अत्याधुनिक ॲन्टिजन पद्धतीने तपासणी करण्यात आली.
रूग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. एकीकडे पॉझिटिव्ह रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, तर दुसरीकडे एमएचएमएच ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, पॉझिटिव्ह होऊन घरी गेलेले नागरिक यांच्याशी वारंवार संवाद साधून त्यांना योग्यवेळी वैद्यकीय सहाय्य देण्याचे काम महापालिकेने केले.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानात मृत्यूदर कमी करणे, हा मुख्य उद्देश आहे. औरंगाबाद शहरात यापूर्वी पाच वेळेस सर्वेक्षण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ४०० पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दररोज ७०० ते ८०० पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत औरंगाबाद शहरात सर्वात कमी रूग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.