औरंगाबाद : बेरोजगारी, शेतकरी यांच्या समस्या विधान परिषदेत पोटतिडकीने मांडून त्या सोडवण्यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विधान परिषदेत पाठविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे, असे मत आ. प्रदीप जैस्वाल यांनी व्यक्त केले. मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्य देणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ छत्रपती हॉल भगतसिंगनगर, हर्सूल येथे बुधवारी आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते.
यावेळी सतीश चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यात बेरोजगार पदवीधरांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याचे काम मी १२ वर्षांपासून करीत आहे. शासन दरबारी प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या अनुदानासंदर्भातील प्रश्न तात्काळ मार्गी लावून विनावेतन काम करणाऱ्या सर्व शिक्षकबांधवांना न्याय देण्यात येईल, असे अभिवचन चव्हाण यांनी दिले, तर मध्य मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्य दिले जाईल, असे आश्वासन शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी दिले.
कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब औताडे, जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक अभिजित देशमुख, नगरसेवक बन्सी जाधव, सीताराम सुरे, किशोर नागरे, रूपचंद वाघमारे, शिवसेना उपशहरप्रमुख संजय हरणे, राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण औताडे, प्रा. सुधाकर कापरे, सतीश वेताळ, रामनाथ औताडे, रहीम पटेल, गणेश पवार, राजू अहिरे, संदीप चव्हाण, गणेश तुपे, युनूस पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधाकर कापरे यांनी केले, तर आभार लक्ष्मण औताडे यांनी मानले.