तिकीटासाठी मोठ्या पवारांकडे गेलेल्या सतीश चव्हाणांची अजित दादांच्या तंबूत पुन्हा एन्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:56 IST2024-12-06T11:54:13+5:302024-12-06T11:56:07+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये लावलेल्या समर्थकांच्या होर्डिंग्जमुळे राजकीय चर्चांना उधाण

तिकीटासाठी मोठ्या पवारांकडे गेलेल्या सतीश चव्हाणांची अजित दादांच्या तंबूत पुन्हा एन्ट्री?
छत्रपती संभाजीनगर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून निवडणूक लढवली, मात्र, गंगापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पराभव झाल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या तंबूत परत जाणार असल्याचे संकेत शहरातील चिश्तिया चौकात लावण्यात आलेल्या एका होर्डिंग्जमुळे मिळू लागले आहेत. महायुतीमुळे गंगापूर मतदारसंघातून भाजप विरोधात उमेदवारी मिळणार नाही, हे माहिती असल्यामुळे आ. चव्हाण यांनी ऐनवेळी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळविली. तसेच अजित पवार गटाचा राजीनामाही दिला होता.
राजीनामा फक्त उमेदवारीसाठीच होता, आता आ. चव्हाण पुन्हा अजित पवार गटात सक्रिय होतील, असे बोलले जात आहे. राजकारणापुरत्या या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचा हा खेळ असल्याची चर्चा त्या होर्डिंग्जमुळे सुरू झाली आहे. रा. काँ. पा. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी ते होर्डिंग्ज लावले आहे.
विधानसभा प्रचारातही डबल गेम
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डबल गेम केला. पूर्व मतदारसंघात पदाधिकारी महायुतीचा प्रचार करीत असत. नंतर ते पदाधिकारी गंगापूर मतदारसंघात आ. प्रशांत बंब यांच्या विराेधात प्रचार करीत असत. हा सगळा डबल गेम खुलेआम सुरू असल्याचे सर्वांनी पाहिले. महायुती नावालाच होती, सोयीनुसार राजकारणाचा पॅटर्न गंगापूरच्या मतदारांना पटला नाही. त्याचे परिणाम निकालाच्या रुपाने समोर आल्याचे बोलले जात आहे.