लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सत्याग्रह हे एक युद्धशास्त्र आहे. त्यात यश निश्चित मिळते. पण आता हे शास्त्र मागे पडते आहे. सत्याग्रह हे के वळ परकीयांच्या सत्तेसाठी असून, स्वकीयांच्या सत्तेसाठी नाही, असा सोयीस्कर अर्थही अनेक जण घेत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष तथा समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गुरुवारी येथे केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या समर्थनगरातील महात्मा गांधी भवनाचे नूतनीकरण करण्यात आले.यानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि वर्तमान’ यावर परिसंवाद घेण्यात आला. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, प्रा. जयदेव डोळे हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. माधव रत्नपारखी, अन्वर राजन, अॅड. प्रदीप देशमुख, डॉ. मच्ंिछद्रनाथ गोर्डे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सप्तर्षी म्हणाले की, समाजवादी किंवा लोकशाहीवादी विचारसरणीच्या अंतिम प्रगल्भ टप्प्यात असताना जे लोक गांधीवादी झाले नाहीत, त्यांनी पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करावे की ते खरंच लोकशाहीवादी होते की नाही. सध्या अनेक तुकड्यांमध्ये समाजाची विभागणी होत आहे. यामुळे समाजाची ओळख संपत चालली आहे. सध्या ‘ओम नमो नम:’ हा एकच मंत्र शिल्लक राहिला आहे.न्या. चपळगावकर म्हणाले की, गांधी हे अराजकतावादी होते, असा कायम अपप्रचार केला जातो. पण त्यांनी केवळ अन्यायी कायदा पाळायचा नाही, असे सांगितले होते. गांधी आणि राज्यघटनेचा काही संबंध आहे, हेदेखील आज शिकविले जात नाही. न्यायसंस्थेविषयी समाजात द्वेष आणि तिरस्कार पसरविला जात आहे. पण न्यायसंस्था या दुबळ्यांसाठी आधार असल्यामुळे निदान आम्ही दुबळ्यांसाठी कार्य करतो, असे म्हणविणाऱ्यांनी तरी कायद्याचा सन्मान करावा. मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये जो विध्वंस सुरू आहे, निर्वासितांचा जो प्रश्न आहे, त्यावर युनो किंवा अन्य देश निरुत्तरित आहेत. या प्रश्नांकडे गांधीजींसारखे निर्लेप मनाने पाहणारा माणूस असता तर नक्कीच उत्तर सापडले असते.गांधी सत्य आणि अहिंसा मानणारे होते; परंतु आजचा वर्तमान या दोन्ही गोष्टींच्या जवळही फिरकत नसून असत्य आणि हिंसा याने बरबटलेला आहे, असे प्रतिपादन प्रा. डोळे यांनी केले. आजची माध्यमेही नि:संदिग्धपणे लिहीत नसून ‘फेकन्यूज’ हा प्रकार गांधीजींच्या काळापासून अस्तित्वात होता आणि गांधीजी ‘फेकन्यूज’चे पहिले बळी होते, असेही त्यांनी काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले. गांधीजींना खेडे स्वयंपूर्ण हवे होते, पण आज त्यांना केवळ स्वच्छतेपुरतेच मर्यादित ठेवून त्यांचा उपहास के ला जात आहे.अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शेख इकबाल मिन्ने यांनी गांधीजींवरील रचना सादर केली.
‘सत्याग्रह हे यश देणारे युद्धशास्त्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:25 AM
सत्याग्रह हे एक युद्धशास्त्र आहे. त्यात यश निश्चित मिळते. पण आता हे शास्त्र मागे पडते आहे. सत्याग्रह हे के वळ परकीयांच्या सत्तेसाठी असून, स्वकीयांच्या सत्तेसाठी नाही, असा सोयीस्कर अर्थही अनेक जण घेत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष तथा समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गुरुवारी येथे केले.
ठळक मुद्देकुमार सप्तर्षी : औरंगाबाद येथे गांधी भवनाच्या नूतनीकरणानिमित्त परिसंवाद