औरंगाबाद : तब्बल ६-६ दिवसांनी येणारे पाणी अत्यंत जपून वापरण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. ग्रामीण भागातील किंवा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती पाहता आपल्याकडे बरेच आहे, अशी परिस्थिती आहे. सांडपाण्यावर होणारी पुनर्प्रक्रिया, पाणी पुनर्भरण योजना यांसारखे इलाज मोठ्या स्तरावरचे आहेत; पण घरगुती स्तरावर पाणी बचतीच्या काही स्तुत्य उपाययोजना राबवून सुज्ञ नागरिक पाण्याची बचत करू पाहत आहेत.
पाणी बचतीचा एक नवा उपाय आज काही घरांमध्ये वापरला जात आहे. यामध्ये नळाच्या तोटीला फुगा लावला जातो. या फुग्याला काही छिद्रे पाडली जातात. नळ सोडला की एकदम पाणी बाहेर न येता फुग्याच्या छिद्रातून संथ धारेत बाहेर येते. यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी बचत होते, असे या उपायाचा अवलंब करणाऱ्यांनी सांगितले. या पद्धतीत साधारण एक फुगा १५ दिवस वापरता येतो.
भाज्या किंवा डाळ- तांदूळ धुऊन उरणारे पाणी अनेक गृहिणी साठवून ठेवतात आणि या पाण्याचा उपयोग झाडांसाठी करतात. धुण्याचे पाणी सांडपाणी म्हणून किंवा सडा टाकण्यासाठी अनेक घरांमध्ये वापरले जाते. घरी आलेल्या पाहुण्याला पाणी दिले जाते. अनेकदा पाहुणे थोडेसेच पाणी पितात आणि उरलेले पाणी मग वाया जाते. यामुळे येणाऱ्या पाहुण्यांसमोर पाण्याचा तांब्या किंवा पाण्याची बाटली आणि रिकामे पेले ठेवायचे म्हणजे मग येणारा पाहुणा त्याला हवे तेवढे पाणी पेल्यात ओतून घेतो आणि पिण्याचे पाणी वाया जात नाही, अशी पद्धत काही स्मार्ट गृहिणी अवलंबत आहेत.
स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा महिलांना हात धुवावे लागतात. सवयीनुसार लगेचच मोठा नळ सोडला जातो, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी वाया जाते. याला उपाय म्हणून अनेक महिला सिंकमध्ये भांडे ठेवतात जेणेकरून हे धुतलेल्या हाताचे पाणी भांड्यात जमा होते आणि ते झाडांसाठी वापरता येते.
झाडांना भांड्याने किंवा नळीने पाणी टाकले, तर खूप पाणी लागते. त्यामुळे घरच्या घरी झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याचा उपायही अनेक घरांमध्ये करण्यात येतो. यामुळे झाडांना पाणी तर मिळतेच; पण मोठ्या प्रमाणावर पाणी बचतही होते. यामध्ये संक्रांतीला मिळणारे सुगडे किंवा प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्यात येतात. सुगड्याला तळाशी लहानसे छिद्र पाडायचे. हे सुगडे झाडाच्या मुळाशी मातीत घट्ट रोवायचे. सुगड्यात पाणी टाकले की ते पाणी थेंब-थेंब या पद्धतीने मुळापर्यंत पोहोचते. काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटलीचा उपयोगही यासाठी करण्यात येतो. यामध्ये बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडायचे या छिद्रात एक सुतळी किंवा बारीक दोरी टाकायची आणि तिचे टोक थेट झाडाच्या मुळापर्यंत न्यायचे. बाटली झाडाचा आधार देऊन थोड्या वर बांधून टाकायची. या बाटलीचा वरचा भाग कापून त्यात पाणी टाकायचे. यामुळे दोरीच्या आधारे पाणी थेट झाडाच्या मुळापर्यंत जाते.
पाणी बचतीसाठी नळांना वॉटर एरेटर पाणी बचतीसाठी नळांना वॉटर एरेटर बसविण्याची पद्धतही आता अवलंबिली जात आहे. स्वप्नील महाजन यांनी मिलेनियम पार्क येथील घरांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविला असून, या सोसायटीतील २५० घरांपैकी ७० घरांमध्ये एरेटर बसविण्यात आले आहे. एरेटरमुळे पाणी कमी धारेतून पण अधिक वेगात येते. यामुळे दिवसाला एका नळातून ४५ लिटर पाणी वाचते, असे महाजन यांनी सांगितले. झाडाच्या आसपासच्या मातीवर वाळलेले गवत टाकून ठेवले तर ऊन थेट मातीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे माती अधिक काळ ओली राहून झाडांना तुलनेने कमी पाणी लागते.