लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : मानव विकास मीशनची बस गावात येत नसल्यामुळे बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमधील युवतींना शिक्षणासाठी दररोज आठ ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पालकांसह ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात असून, बस सुरू करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील गव्हाळीवाडी, उसारवाडी, सागरवाडी, सागरवाडीफाटा, मालेवाडी चौफुली येथील आठवी ते बारावीच्या वर्गातील ६० मुली शिक्षणासाठी ढासला येथील सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येतात. एसटी महामंडळाकडून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी असलेली मानव विकास अभियानाची बससेवा या गावांमध्ये सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुलींना दररोज पायी अथवा खाजगी वाहनाने शाळेत शिक्षणासाठी जावे लागते. परंतु रस्त्यावरील अडथळ्यांमुळे मुलींची शाळेत जाताना मोठी गैरसोय होते. या ६० मुलींसाठी बस सुरू करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बस आगार नियंत्रकांना २८ जूनला पत्र दिले. मात्र, संबंधितांकडून अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.
सावित्रीच्या लेकींची दररोज शिक्षणासाठी पायपीट..!
By admin | Published: July 10, 2017 12:37 AM