वाळूज महानगर : वडगावातील संतोष विठ्ठल वाघमारे या बेपत्ता कामगाराच्या आत्महत्येचे रहस्य उलगडले आहे. लग्नापूर्वीचे पत्नीचे एका तरुणासोबत असलेले एकत्रित फोटो बघून संतोष वाघमारे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी इरफान पठाण (रा. अंबरहिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष विठ्ठल वाघमारे (३२ रा. जोगवाडा, जटवाडा, ह.मु. वडगाव) हा कंपनीत कामगार होता. तो दि. ९ ऑगस्ट रोजी कंपनीत कामाला चाललो, असे सांगून घराबाहेर पडला. तो घरी न परतल्याने त्याच्या पत्नीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळी तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरालगतच्या खदानीत एका झाडाला अनोळखी इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांनी पाहिला. पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी घाटीत पाठविला. मयत वडगाव येथून बेपत्ता असलेला संतोष वाघमारेचा असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. संतोष वाघमारे बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पत्नीने इरफान पठाण याच्यावर संशय व्यक्त करून त्याच्याविरुद्ध हर्सूल ठाण्यात तक्रार दिली.
मयत संतोष याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढत दोषीविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी प्रेत ताब्यात घेतले. संतोष वाघमारे याने आत्महत्या केल्यानंतर त्याची पत्नी छाया (नाव बदलले आहे) हिने पोलिसांत दिलेल्या फिर्यादित ६ सप्टेंबरला संतोष वाघमारे हा जोगवाडा येथून वडगावकडे येत असताना इरफान पठाणने त्यास एकतानगर- हर्सूल येथे अडविले.
इरफानने संतोषच्या पत्नीचे लग्नापूर्वी काढलेले फोटो एडिट करून संतोषला दाखविले. घरी परत आल्यावर संतोषने पत्नीला फोटोविषयी विचारणा केली असता तिने लग्नाआधी इरफान सोबत ओळख असल्याने त्याने फोटो काढून ते एडिट केले व तुम्हाला दाखविल्याचे म्हटले. एवढेच नाही, तर इरफानने केलेली शरीरसुखाची मागणी धुडकावून लावल्यानंतर त्याने आपणास बरबाद करून टाकण्याची धमकीही दिल्याचे तिने संतोषला सांगितले होते. पत्नीसोबत इरफान पठाण याचे एकत्रित फोटो बघितल्यानंतर नैराश्यातून संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयत संतोषच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी इरफान पठाणविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गौतम वावळे करीत आहेत.