१९६७ साली बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून क्रांतिसिंह नाना पाटील आणि काँग्रेसकडून अॅड. द्वारकादास मंत्री यांच्यात लढत झाली. ही लढत कम्युनिस्ट पक्षाच्या फक्त ‘...फिटलं म्हणा!’ या टँगलाईनने खूप गाजली होती. या निवडणुकीच्या आठवणी सांगत आहेत जेष्ट विधिज्ञ मनोहर टाकसाळ..
मराठवाड्यातील बीड, नगर जिल्हे कम्युनिस्ट पक्षाचे गड होते. या जिल्ह्यांतील बहुतांश आमदार हे कम्युनिस्ट होते. १९६७ च्या बीड लोकसभा निवडणुकीत दोन दिग्गज उभे होते. कॉंग्रेसकडून अॅड.मंत्री यांच्या प्रचारासाठी पुरुषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, काशीनाथ जाधव ही मातब्बर मंडळी होती. त्यांच्या जोडीला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, देवीसिंग चव्हाण हे सुद्धा आले होते. त्याविरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडून मातब्बर असे कोणी नव्हते. ते स्वत:च मातब्बर होते. बैलगाडी, टांगा, सायकलवर प्रचार करण्यात येत होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत मीसुद्धा प्रचाराला होतो. त्यांची सभा सुरू होण्यापूर्वी गाणे म्हणण्याचा कार्यक्रम माझ्याकडेच असे.
नानांच्या सभेसाठी खेड्यापाड्यातून महिला, पुरुष बैलगाड्या करून येत. त्यांना पाहण्यासाठी खूप गर्दी होत असे. नाना विरोधी पक्षाच्या वर्मावरच बोट ठेवत. त्यांच्या भाषणात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांचे प्रश्न असत. तेव्हा शेतकऱ्यांकडेही अनेकांचे कर्ज होते. त्यासाठी ते जाहीर सभांमध्ये ‘...फिटलं म्हणा’ अशी घोषणा देत. सावकाराने आपल्या श्रमाच्या घामातूनच पैसा उभारलेला आहे. तो पैसा आपलाच आहे. त्यामुळे सावकाराला एकदा ‘फिटलं म्हणा’ पुन्हा त्याचे काहीही पैसे नसल्याचे स्पष्ट होईल. या पद्धतीने त्यांनी अनेकांना कर्जमाफी मिळवून दिली होती.
ते प्रत्येक सभेत दोन उदाहरणे कायम सांगत. त्यातील पहिले हे ‘कणीक तिंबण्यासाठी अगोदर पीठ मळावे लागते. पीठ मळून मळून तयार झाल्यावर ते चांगले वळते.’ या पद्धतीने लोकांनाही चांगल्यासाठी खूप सांगावे लागते. तरच वळतात. या उदाहरणावर लोकांच्या टाळ्या पडत. दुसरे उदाहरण ते ‘शेतकरी, कामगारांची मोळी ही लाकडाच्या फांद्याप्रमाणे एकमेकांमध्ये मिसळलेली असली पाहिजे. एकमेकंत गुतडा निर्माण झाल्यास मोळी तुटत नाही, फुटत नाही’. यावरही लोक भरभरून प्रतिसाद देत. नानांकडे एक गाडी होती. ते त्या गाडीतूनच सगळीकडे प्रवास करायचे. प्रचारादरम्यान खेड्यापाड्यातही कार्यकर्त्यांच्या घरीच राहायचे. त्यांना गूळ आणि शेंगदाणे खाण्याची खूप सवय होती.
खेड्यात असल्यास मोकळ्या जागेत घोंगडी टाकूनच झोपायचे. सकाळी पहाटेच उठून दिनचर्या सुरू करीत होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्थापन केलेल्या पत्री सरकारमुळे त्यांना सर्वत्र खूप प्रतिसाद मिळत होता. तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही अगदी खेड्यापर्यंत होते. या निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील यांना मोठा विजय मिळाला. त्यांची विजयी मिरवणूकही बीड शहरात मोठी काढण्यात आली. नाना पश्चिम महाराष्ट्रातील असले तरी लोकप्रतिनिधी बीडचे होते. निवडून आल्यानंतरही त्यांचे नियमितपणे बीडला दौरे असत. सतत कार्यकर्त्यांची विचारपूसही करीत. असा सहवास लाभलेला क्रांतिकारी व्यक्ती सर्वांनाच हवाहवासा वाटे.
( शब्दांकन : राम शिनगारे )