औरंगाबाद : शहरातील मोकाट श्वानांची नसबंदी करण्याचा निर्णय महापालिकेने २०१५-१६मध्ये घेतला. मागील ७ वर्षात मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने तब्बल २८ हजार ५३३ श्वान पकडले. त्यांच्यावर नसबंदी केली. या कामावर तब्बल २ कोटी ६६ लाख ११ हजार रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरीही शहरात हजारो मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे. आता या गौडबंगालाचीच चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरात ४० हजारांवर मोकाट श्वान असावेत, असा अंदाज मनपाकडून व्यक्त करण्यात येतोय. अनेकांवर ते हल्ला चढवितात. बारूदगरनाला, मुकुंदवाडी येथील दोन तरुणांना तर अक्षरश: जीवही गमवावा लागला. या घटनांमुळे मनपा सर्वसाधारण सभेत मोठा खल झाला. श्वानांची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निविदा काढून दरवर्षी खासगी एजन्सी नियुक्त करण्यात आल्या. प्रारंभी एका श्वानामागे खासगी एजन्सीला ६२५ रुपये देण्यात येत होते. यामध्ये श्वान पकडणे, शस्त्रक्रिया करणे आणि त्यानंतर श्वान परत त्याच भागात नेऊन सोडणे, असे ठरले. उस्मानाबाद येथील अरिहंत वेल्फेअर सोसायटीमार्फत हे काम सुरू आहे. ९०० रुपये एका श्वानामागे त्यांना देत असल्याची माहिती मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने माजी नगरसेवक गोकुळ मलके यांना दिली. २०१५ - १६ ते २०२१ - २२ पर्यंत २८,५३३ श्वान पकडण्यात आले. त्यांच्यावर २ कोटी ६६ लाख ११ हजार रुपये खर्च झाल्याचेही या विभागाने म्हटले.
कोरोनात श्वान पकडले?कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत कोणीही घराबाहेरही पडत नव्हते. याच काळात म्हणजे २०२० - २१मध्ये सर्वाधिक १० हजार श्वान पकडण्यात आले. त्यापाठोपाठ २०२१ - २२मध्ये ८ हजारांहून अधिक श्वान पकडल्याचे सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चौकशी कराश्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे श्वान नागरिकांच्या अंगावर धावून जातात. आतापर्यंत झालेल्या खर्चाची प्रशासनाने चौकशी करावी.- गोकुळ मलके, माजी नगरसेवक
श्वान नसबंदीवरील खर्चाचा तपशीलवर्ष - श्वान संख्या- खर्च रक्कम२०१५-१६---६७२- ४,२०,०००२०१६-१७---३०७- १,९१,०००२०१७-१८---३,४४०- ३,०९६,०००२०१९-२०---४,५३४- ४३,०७,३००२०२०-२१---१०,६८१- १,०१,४६,९५०२०२१-२२---८,८२४- ८३,८२,८००एकूण-----२८,५३३---२,६६,११,०५०