सिल्लोड ( औरंगाबाद ) : घराशेजारून भरधाव वेगाने कार नेणाऱ्या चालकास गाडी हळू चालव म्हणणे जीवावर बेतले आहे. कार चालकाने रागाच्या भरात लाकडी दांड्याने त्या व्यक्तीला जबर मारहाण केली. उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री अजिंठा येथे घडली. मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान ( ५०, रा.अजिंठा ) असे मृताचे नाव असून या प्रकरणात अजिंठा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
अजिंठा येथील जामा मशीदजवळ असलेल्या बोळीत मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान उभे होते. रात्री १० वाजेच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने त्याच्या अगदी जवळून गेली. यामुळे घाबरलेल्या मोहंमद शफीयोद्दीन यांनी चालक सादिकला कार हळू चालव, मारतो का ? असे ओरडून सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला.
दरम्यान, कार चालकाने घरी मोहंमद शफीयोद्दीन यांच्यासोबत वादाची माहिती दिली. यामुळे कार चालकाचे भाऊ व नातेवाईक शेख जावेदजान, मोहमद शेख, अथर शेख हे पुन्हा घटनास्थळी आले. त्यांनी संगनमत करून मोहंमद शफीयोद्दीन यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. कार चालक सादिकने हातातील लाकडी दांडा शफीयोद्दीन यांच्या डोक्यात मारला. रक्त बंबाळ अवस्थेतील शफीयोद्दीन यांना नागरिकांनी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना केले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मृताचा मुलगा शेखमोहम्मद शोफियांन मोहम्मद शफीयोद्दीन ( २३ ) याच्या तक्रारीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक उर्फ मुन्नाजान मोहमद ( २८ ) , शेखजावेदजान मोहमदशेख ( ३२ ) , शेख अथर जाफर बेग ( ३८, सर्व रा.अजिंठा ) अशी आरोपींची नवे आहेत. आरोपींविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात कलम ३०२,३२३,५०४,३४ भादवि नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार राजू राठोड, अक्रम पठाण, राजू बरडे,रविकिरण भारती,हेमराज मिरी,अरुण गाडेकर यांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.घटनेची माहिती मिळताच सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विजयकुमार मराठे यांनी घटनास्थळी भेट दिली.या घटनेमुळे अजिंठ्यात खळबळ उडाली आहे.