वाशी : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, १२ नागरिकांसह १७ जनावरांना चावा घेऊन जखमी केल्याने शहरवासियांत घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयासह पशुवैद्यकीय दवाखान्यातही पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर द्यावयाची लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वाशी शहरातील नाईकवाडी वस्ती, रामनगर, भांडवलेवस्ती या भागातील नागरिक या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे त्रस्त झाले आहेत. या कुत्र्याने बळीराम नाईकवाडी, अल्का करडे, कविता ढवळे, विमल क्षीरसागर, पद्मीन जाधव, राजेंद्र दीक्षित यांच्यासह १२ जणांना गुरूवारी व शुक्रवारी चावा घेतला. याच भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनाचेही या कुत्र्याने लचके तोडले. त्यामुळे नगर पंचायतीने या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, कुत्रा चावलेले हे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जात असून, येथे मात्र गुरूवारी काही रुग्णांना लस उपलब्ध नसल्याचे सांगून जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखविण्यात आला. याबाबत वैद्यकीय अधीक्षक शेळगीकर यांना विचारणा केली असता कुत्रे चावल्यानंतर द्यावयाची रॅबीपूर नावाची लस उपलब्ध आहे. मात्र, अॅन्टी सिरम नावाची लस उपलब्ध नसून, ती महागडी असल्याचे त्यांनी सांगितले.
पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ
By admin | Published: February 25, 2017 12:33 AM